८० अब्ज डॉलर्स, ४ देश, ४७० विमानं… जाणून घ्या का आहे एअर इंडियाचा ऐतिहासिक करार खास?

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी २०२३: एअर इंडियाने विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठा करार केलाय. टाटा सन्स या एअर इंडियाची मालकी असलेल्या कंपनीने म्हटलंय की एअरलाइन सुरक्षा, ग्राहक सेवा, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, नेटवर्क आणि मानव संसाधनांच्या दिशेनं मोठ्या परिवर्तनाच्या प्रवासावर आहे. टाटा समूह ट्रिलियन डॉलर्स खर्चून अत्याधुनिक बोईंग आणि एअरबस विमाने खरेदी करणार आहे.

टाटा समूह एकूण ४७० विमानं खरेदी करणार आहे. टाटाने विमान वाहतूक क्षेत्रातील आघाडीची कंपनी, अमेरिकेची बोइंग आणि युरोपची एअरबस यांच्याशी हा करार केलाय. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या करारासाठी भारताचं अभिनंदन केलंय यावरून या कराराचं महत्त्व समजू शकतं. याशिवाय यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही या कराराचे त्यांच्या देशासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचं वर्णन केलंय. सुनक यांनी भारतासोबत व्यावसायिक संबंध सुरू ठेवण्यावरही भर दिला. जर आपण रक्कम पाहिली तर हा करार ८० अब्ज डॉलर्स म्हणजेच ६.४० लाख कोटी रुपयांचा आहे.

टाटा समूहाच्या एअर इंडियाने काय खरेदी केलं?

ऑर्डरमध्ये ४० Airbus A350s, २० Boeing 787s आणि १० Boeing 777-9s वाइड-बॉडी विमानं, तसेच २१० Airbus A320/321 Neos आणि १९० Boeing 737 MAX सिंगल-आइसल विमानांचा समावेश आहे.

एअर इंडियाच्या ताफ्यात विमान कधी सामील होईल?

एअर इंडियाच्या मते, नवीन विमान २०२३ च्या शेवटच्या महिन्यांपर्यंत सेवेत येईल. २०२५ च्या मध्यापर्यंत बहुतेक नवीन विमानं एअर इंडियाच्या ताफ्यात सामील होतील.

एअर इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनी सांगितलं की, या नवीन विमानांमुळं एअरलाइन्सच्या ताफ्याचे आधुनिकीकरण होईल आणि त्याचे जागतिक नेटवर्क मोठ्या प्रमाणावर वाढेल.

मॅक्रॉन, सुनक आणि बायडेन यांची या करारावर प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर इंडिया-एअरबस व्यवहाराला “ऐतिहासिक करार” म्हणून संबोधले जे भारत आणि फ्रान्स यांच्यातील घनिष्ठ संबंधांचे प्रतिबिंब देखील दर्शवते. एअरबसचे ऑपरेशन ब्रिटन आणि फ्रान्स या दोन्ही देशांमध्ये आहे. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले की, एअर इंडियाने एअरबससोबत २५० विमानांच्या खरेदीसाठी केलेला करार भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक आणि मैत्रीपूर्ण भागीदारीमध्ये एक मैलाचा दगड ठरेल.

यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले की, एअर इंडिया, एअरबस आणि रोल्स-रॉयस यांच्यातील ऐतिहासिक करार यूकेच्या भरभराटीच्या एरोस्पेस क्षेत्रासाठी अमर्याद वाढ असल्याचं दर्शवितो. ते म्हणाले की या करारामुळे डर्बी ते वेल्सपर्यंत उत्पादन क्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आणि नवीन संधी निर्माण होतील, यामुळं आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या निवासस्थान १० डाउनिंग स्ट्रीट येथून जारी केलेल्या निवेदनानुसार, भारत ही एक मोठी आर्थिक शक्ती आहे, जी २०५० पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये मध्यमवर्गाचा सहभाग महत्त्वाचा असंल. आम्ही सध्या भारतासोबत मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी करत आहोत जे आमचे व्यावसायिक संबंध नवीन उंचीवर नेतील.

पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी चर्चा केली

करारावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारीबद्दल समाधान व्यक्त केलं आणि ते म्हणाले की सर्व क्षेत्रांमध्ये जोमदार विकास होत आहे. या करारामुळं दोन्ही देशांमध्ये रोजगार निर्माण होईल, असं ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी इतर अमेरिकन कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचं निमंत्रण दिलं.

कोणत्याही एअरलाइनद्वारे, कुठेही दिलेली सर्वात मोठी ऑर्डर

एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, कोणत्याही भारतीय विमान कंपनीने दिलेली ही केवळ सर्वात मोठी ऑर्डर नाही तर कोणत्याही एअरलाइनने, कुठेही, कधीही दिलेली सर्वात मोठी सिंगल एअरक्राफ्ट ऑर्डर आहे. ही ऑर्डर भारताच्या विलक्षण प्रमाणात आणि वाढीच्या अनोख्या संधींची साक्ष देतो.

ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा