निवडणूकीच्या वचन नाम्यातील ८० टक्के कामांची वचनपूर्ती झाली आहे : ऍड. राजीव साबळे

माणगाव, २४ जानेवारी २०२४ : माणगाव नगरपंचायतीची नवीन इमारत, माणगाव नवीन पाणी पुरवठा योजना तसेच माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या CBSE अभ्यासक्रमाची नवीन इमारत या कामाची भूमिपूजने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते शनिवार दि. २७ जानेवारी रोजी सायंकाळी ठिक ५.०० वाजता होणार आहेत. यावेळी अशोकदादा साबळे विद्यालयाच्या भव्य पटांगणावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, आ. भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी, आ. महेंद्र थोरवे, शिवसेना नेते ॲड. राजीव साबळे, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्क प्रमुख अरुण चाळके, शिवसेना तालुकाप्रमुख महेंद्र माणकर, युवा सेना प्रमुख विपुल उभारे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, उपनगराध्यक्ष राजेश मेहता, सभापती, सर्व नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत ॲड. राजीव साबळे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी दिली. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश मेथा, नगरपंचायत मुख्यअधिकारी संतोष माळी, स्कूल कमिटी चेअरमन नरेंद्र गायकवाड, पाणी पुरवठा सभापती कपिल गायकवाड, नगरसेवक दिनेश रातवडकर, सिराज परदेशी माजी नगसेवक नितीन बामुगडे, विरेश येरूनकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना ऍड. राजीव साबळे म्हणाले की, ‘नगरपंचायत निवडणुकीपूर्वी जनतेला आम्ही दिलेल्या वचनांची ८० टक्के वचन पूर्ती झाली आहे; उर्वरित कामे देखील येत्या ३ वर्षात मार्गी लागतील.’

नगर पंचायत नवीन इमारत बांधकामासाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च येणार आहे. या नवीन इमारतीमुळे माणगाव शहराचा शासकीय कारभार जलदगतीने होण्यासाठी हातभार लागणार आहे. ही सुसज्ज इमारत त्याच जागेवर चार मजली बांधण्यात येणार आहे. या इमारतीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, कार्यकारी अधिकारी, सभापती, गटनेते, विरोधी पक्षनेते, नगरसेवक, सभागृह यांची स्वतंत्र दालने असणार आहेत. तसेच व्यावसायिक गाळे बांधणार असून वाहनतळाची सुविधा देखील असेल. तसेच सुमारे ५० कोटींच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. यामध्ये पूर्व, पश्चिम असे दोन भाग करण्यात येणार आहेत. या योजने अंतर्गत ६ टाक्या बसविण्यात येणार असून प्रति माणसी १३५ लिटर पाणी पुरविण्यात येणार आहे. खांदाड येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र करण्यात येणार आहे. योजना पूर्णपणे सौर ऊर्जेवर करण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षात काम पूर्ण करण्यात येईल. तसेच माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव अशोक साबळे यांच्या हस्ते माणगाव शहरातील गणेश नगर येथे केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या सी.बी.एस.ई. अभ्यासक्रमांतर्गत सुरू होणाऱ्या नवीन आणि अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध असणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या इमारत बांधकामासाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या अभ्यासक्रमाचा फायदा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये होणार असल्याने हुशार आणि गुणवंत विद्यार्थ्यांना गुणात्मक लाभ आपोआपच मिळणार आहे.

‘निवडणुकीच्या वेळी माणगांवकरांना दिलेली सर्व वचने पूर्ण करतोय. आ. भरत गोगावले यांच्या विशेष प्रयत्नांतून विकासकामे मार्गी लागली असल्यामुळे त्यांनी त्यांचे आभार मानले. क्रीडा संकुल, नाना-नानी पार्क, विकास आराखडा इत्यादी रखडलेली कामे सुद्धा लवकरच मार्गी लागणार आहेत. माणगांवमधील वाहतूक कोंडीची समस्या ना. रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करून सोडविण्यात येईल. शासनाचे आभार मानण्यासाठी या कार्यक्रमांना आणि सभेला नागरीकांनी अवश्य उपस्थित रहावे’, असे आवाहन ॲड. राजीव साबळे व नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रमोद जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा