पुणे, दि.३ मे २०२० : कोरोनाग्रस्तांच्या या लढाईत सध्या संपूर्ण जग लढत असताना सरकारच्या मदतीसाठी अनेक जण पुढे येत आहेत. त्यातच पुण्यातील शिवाजीनगर येथील ८५ वर्षीय आजींनी पंतप्रधान सहाय्यता निधीला एक लाखाची आर्थिक मदत केली आहे.
या आजींचे नाव सुधा काळे असे आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, मी आमदार शिरोळे यांना फोन करून, “मला देखील कोरोनाच्या लढाईमध्ये खारीचा वाटा द्यायचा आहे”, असे सांगितले. पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी मी एक लाख रुपयांचा धनादेश तयार ठेवला आहे. मात्र, मला घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे तुम्ही कोणाला तरी पाठवून हा धनादेश स्वीकारावा ,अशी विनंती केली. शिरोळे यांनी यांची दखल घेऊन इतर कोणालाही न पाठवता, स्वत:च त्यांच्या घरी घाऊन धनादेश त्यांनी स्वीकारला.
यावेळी सिद्धार्थ शिरोळे म्हणाले की, आजींनी स्वतः फोन करून पंतप्रधान निधीला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. या गोष्टीचा मला नितांत अभिमान वाटला. या मदतीचा स्वीकार करण्यासाठी तसेच त्यांना धन्यवाद देण्यासाठी मी स्वतः त्यांच्या घरी गेलो.
त्यांचे पती दिवंगत श्रीनिवास काळे यांनी देशसेवेची इच्छा बोलून दाखवली होती. तसेच देशासाठी काहीतरी योगदान देण्याचे आहे, त्याची पूर्ती म्हणून दिवंगत श्रीनिवास काळे व दिवंगत शिवगौरी काळे यांच्या स्मरणार्थ ही मदत देताना काळे आजींच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
या वयातही त्यांना देशसेवेसाठी काहीतरी करायचे आहे हे बघून माझ्यामध्ये आणखी उर्जा निर्माण झाली, असा अनुभव सांगत आपण ही कोरोना विरुध्दची लढाई लवकरच जिंकू, असा विश्वास शिरोळे यांनी बोलून दाखवला.
न्युज अनकट प्रतिनिधी: