मुंबई, दि. ९ मे २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात मार्च ते ८ मे या कालावधीत कलम १८८ नुसार राज्यात ९८,७७४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात १९,०८२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. अवैध वाहतूक करणाऱ्या १२८६ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ५४,१४८ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाच्या १५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ६६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून पोलीस विभागामार्फत ३ लाख १५ हजार ४३४ पासचे वितरण करण्यात आले आहे. पोलिसांवर हल्ल्याच्या १९० घटना घडल्या आहेत यातील ६८६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. १०० नंबर वर आलेल्या ८६ हजार २४६ कॉल्सची योग्य दखल घेण्यात आली आहे.
राज्यातील क्वारंटाईन व्यक्तींची एकूण संख्या २,२६,२३६ एवढी आहे. क्वारंटाईन शिक्का असलेल्या ६५३ व्यक्तींना शोधून विलगीकरण करण्यात आले आहे. त्याच बरोबर राज्यात ४७२९ हजार रिलिफ कॅम्प तयार करण्यात आले आहेत. या कॅम्प मध्ये जवळपास ४,२८,७३४ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
६२ पोलीस अधिकारी आणि ४९५ पोलीस कर्मचारी संसर्गित:
कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी-कर्मचारी देखील २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या ६२ पोलीस अधिकारी आणि ४९५ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. मुंबई ३, पुणे १, सोलापूर शहर १ अशा ५ पोलीस वीरांना कोरोना मुळे जीव गमवावा लागला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी