कोल्हापुरात आता मटण विक्रीवर निघाला तोडगा

कोल्हापूर : गेल्या कित्येक दिवसांपासून कोल्हापूर येथे मटण विक्रीस बंदी होती. त्यामुळे कोल्हापूरकरांना मटण खाता येत नव्हते. परंतु आता कोल्हापुरातील मटण दराचा वादावर अखेर तोडगा निघाला आहे. कोल्हापुरात आता ५२० रुपये प्रतिकिलो दराने मटण विकण्यावर अखेर एकमत झालं आहे. त्यामुळे मटण विक्रेतेही समाधानी झाले आहेत आणि कोल्हापुरातील खवय्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

मटण विक्रेते आणि कृती समितीच्या बैठकीत मटण ५२० रुपये प्रतिकिलो दराने विकण्याचा निर्णय घेण्यात आला. मटण दराच्या वादामुळे गेल्या दहा दिवसांपासून कोल्हापुरात मटण विक्रेत्यांनी बंद पुकारला होता. मात्र मटणाच्या दरावर तोडगा निघाल्याने मंगळवारीही मटण विक्रीच्या दुकानांबाहेर खवय्यांच्या रांगा लागण्याची चिन्हं आहेत. अन्न आणि औषध प्रशासन तसेच महापालिकेकडून सुरु असलेली कारवाई यामुळे कोल्हापुरातील मटण विक्रेत्यांनी मटण विक्री बेमुदत बंद ठेवली होती.

४८० रुपये प्रतिकिलो असा तोडगा निघाल्यानंतर मटण विक्रेत्यांनी मटण विक्री सुरु केली होती. मात्र अन्न आणि औषध प्रशासन तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मटण दुकानांवर छापासत्र सुरु झाल्यामुळे हा मटणाचा तिढा वाढला होता. कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा आणि मटण मिळेल या अपेक्षेने हॉटेलमध्ये येणाऱ्या पर्यटकांना नाईलाजाने मटणाचा ताव चिकनवर काढावा लागत होता.

त्यामुळे कोल्हापुरात कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा आणि मटण मिळणारी ५०० पेक्षा जास्त हॉटेल्स आहेत. यामध्ये दररोज सरासरी पाच ते सात हजार किलो मटणाची आवश्यकता असते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा