पहिल्या टप्प्यातील मेट्रो धावणार सुसाट

पुणे : मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील संत तुकाराम नगर ते फुगेवाडी या पाच किमीच्या टप्प्याचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. एप्रिलपासून तो प्रवाशांसाठी खुला करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले.

वनाज-रामवाडी मार्गिकेतील आनंद नगर ते गरवारे हा पाच किमीचा टप्पा देखील जून अखेरपर्यंत पूर्ण करून जुलै महिन्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे निर्देश आहेत. राज्याच्या विविध शहरांमध्ये महा मेट्रोच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पांचा आढावा बैठक झाली.

पुणे मेट्रोचे काम वेळापत्रकानुसार प्रगतीपथावर असून मार्च २०२२ पर्यंत संपूर्ण ३२.५० किमी मार्गावर, दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो सुरू होणार आहे. नागपूर मेट्रोच्या लोकमान्य नगर ते सीताबर्डी या ११ किमी मार्गाचे काम पूर्ण झाले असून लवकरच या मार्गाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे शहरांतर्गत मेट्रो प्रकल्पाच्या डीपीआरला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार लाइट मेट्रोच्या पर्यायाचा स्वीकार करून त्यानुसार नव्याने डीपीआर बनवण्यात येणार आहे.
नाशिक निओ मेट्रोच्या संदर्भातही तातडीने कार्यवाही होणार आहे. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित, संचालक सुब्रमण्यम रामनाथ, कार्यकारी संचालक एन. एम. सिंग आदी वरिष्ठ अधिकारी मुंबईतील बैठकीला उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा