‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणतच विजयादशमीचे उत्साहात स्वागत केले जाते. या दिवशी देवीने महिषासूर राक्षसाचा वध केला. त्याचबरोबर श्री रामानेही याच दिवशी रावणाचा वध केल्याने या सणाला विजयादशमी असे म्हटले जाते.
साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त म्हणून दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे व्यवहार, नव्या योजनांची, चांगल्या गोष्टींची सुरुवात केली जाते. नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणाचे देशभरात विशेष महत्त्व आहे.
या दिवशी संध्याकाळी आपट्याची पाने सोनं म्हणून लहानग्यांनी मोठ्यांना द्यायची पद्धत आहे. यावेळी ‘सोनं घ्या सोन्यासारखं राहा’ असे म्हटले जाते. त्यानंतर मोठ्यांच्या पाया पडायचे व आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे.
नवरात्रात घटाच्या आजूबाजूला उगवलेले नवधान्य उपटून या दिवशी देवी व देवतांना वाहिले जातात. गवळी बांधव व इतर काही समाज बांधव या दिवशी कालिया नागावर बसलेल्या कृष्णाची पूजा करतात. त्याला शिलांगणाचा उत्सव असेही म्हटले जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर भवानी मातेच्या उत्सवाला याच दिवशी सुरुवात केली होती. अनेक पराक्रमी राजे दसऱ्याच्या दिवशी दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्याचा बेत आखत असत. त्यालाच सीमोल्लंघन म्हणत म्हणून या दिवशी संध्याकाळी सीमोल्लंघन करीत वेशीच्या बाहेर देवाला जाऊन येण्याची पद्धत आहे.
शिलांगणाच्या वेळी डोक्यामध्ये टोपी किंवा पागोटे बांधतात, त्यामध्ये नवधान्याच्या रोपांचा तूरा रोवतात. शिलांगण हा सीमोल्लंघन शब्दाचा अपभ्रंश आहे. या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते.
अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आनंद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची असे या दिवसाचे खास महत्त्व. दाराला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते.