साहित्य: दोन वाट्या ज्वारी, दोन कढीलिंबाचे टहाळे, ६ – ७ लसूण पाकळ्या, थोडे सुक्या खोबर्याचे काप (साधारण पाव वाटी) आणि आवडत असतील तर तेव्हढेच शेंगदाणे, दोन – तीन हिरव्या मिरच्या, पाव चमच्याहूनही कमी हळद, अर्धा चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार, मोठी चिमटीभर साखर, मोहोरी, जिरं मिळून अर्धा चमचा
पाव चमचा हिंग, अर्धी – पाऊण वाटी दही. फार आंबट असेल तर अर्धी वाटीही पुरेल.
जरा सढळ हातानं तेल
कृती: ज्वारी एकदा नीट पाहून, स्वच्छ करून घ्यावी. एकदा धूवून, पाण्यात १० मिनिटं भिजू द्यावी.
ज्वारी चांगली चोळून पुन्हा धूवून निथळू द्यावी आणि त्यातलं पाणी पूर्णपणे निथळलं की मिक्सर मध्ये भरडा करावा.
हा भरडा डब्यात घालून फ्रिजात बरेच दिवस राहातो.
खोबर्याचे काप आणि शेंगदाणे (वापरत असाल तर) निराळे भिजत घालावे. एका बाजूला चार – पाच वाट्या पाणी गरम करत ठेवावं.
आता एखादं जाड बुडाचं भांड, कढई बर्यापैकी तेल घालून चांगली तापू द्यावी आणि त्यात क्रमानी – मोहोरी तडतडल्यावरच जिरं, हिंग, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालावा. यात आता खोबर्याचे काप आणि दाणे निथळून घालावे, हे प्रकरण आच मंद करून एखाद मिनिट परतावं.
यात आता ज्वारीचा भरडा घालून ५ मिनिटं तरी मंद आचेवर परतावं. खमंग सुवास सुटला की यात मीठ, साखर, हळद, लाल तिखट घालून एकदा नीट मिसळून दही घालावं आणि उकळीचं पाणी घालून ढवळावं. गुठळी राहाता कामा नये.
झाकण घालून आंबील शिजू द्यावी. दर मिनिटाला आंबील पाहायला लागते आणि तळापासून ढवळायलाही लागते नाहीतर लगेचच भांड्याला चिकटते भरपूर पाणी असूनही. सो त्यानुसार लक्ष ठेवायचंय आणि समजा लागलंच तर थोड अजूनही पाणी लागेल; शिजेस्तोवर. जरा सैलसर कन्सिस्टंसी हवी फायनल यिल्ड ची.
चांगली शिजली की अगदी गरमागरमच खायला घ्यावी. सोबत एखादं गोड तिखट लोणचं आणि साधं ताक फार मस्त लागतं.