कोल्हापूर: सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना बरीच कसरत करावी लागली होती. बऱ्याच घडामोडी घडल्या नंतर का होईना अखेर शिवसेनेला सत्ता तर मिळालीच परंतु त्याबरोबर मुख्यमंत्रिपद देखील उद्धव ठाकरे यांच्याकडे आले. हे शिवसेनेसाठी एक मोठे यश होते. या सर्व घडामोडी झाल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी आले आहेत.
यापूर्वी लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी अंबाबाई चे दर्शन घेतले होते. ह्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते आज येथे आले आहेत. उद्धव ठाकरे यांनी सकाळी सुमारे दहाच्या सुमारास अंबाबाई चे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर तसेच धैर्यशील माने हेही तेथे उपस्थित होते.
दर्शन घेताना मुख्यमंत्री दहा ते बारा मिनिटे देवळाच्या गाभाऱ्यामध्ये उभे होते. उद्धव ठाकरे यांनी पूर्ण दर्शन घेतल्या नंतर ते मंदिरातून बाहेर पडले. यावेळी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर आणि धैर्यशील माने यांनी उद्धव ठाकरे यांना चांदीचा धनुष्य आणि चांदीचा बाण देऊन त्यांचे स्वागत केले. कोणताही नियोजित कार्यक्रम नसल्यामुळे उद्धव ठाकरे मंदिरातून बाहेर पडताच थेट विमानतळाकडे गेले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले.