छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या मतदार यादीत अफरातफर

लासुर्णे : भवानीनगर (ता.इंदापूर) येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची लवकरच निवडणूक होणार असून प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. परंतु या यादीमध्ये कारखान्याचे पोटनियम डावलून विद्यमान संचालक मंडळाने यादी पाठवलेली आहे. कारखान्याचे पात्र मतदार संख्या २८२१० इतकी असून यापैकी पाच वर्षा पेक्षा अधिक काळ ऊस न पुरविणारे ९९९० सभासद, ३३६३ थकबाकीदार सभासद तसेच ३५१२ मयत सभासद आहेत. पोटनियम व कायद्यानुसार तीन वर्षापेक्षा अधिक काळ ऊस न पुरविणारे सभासद व थकबाकीदार सभासद यांना मतदानाचा अधिकार नसतो मात्र निवडणुकीमध्ये साखरी सभासदांचा मतदानासाठी फायदा करून घेण्याच्या हेतुने विद्यमान संचालक मंडळाने चुकीची मतदार यादी पाठवली असल्याचा आरोप शेतकरी कृती समितीचे पृथ्वीराज जाचक यांनी केला आहे.

येथील कारखान्याची निवडणूक लवकरच होणार असून कारखान्याच्या नियमानुसार तयार केलेली बिनचुक व निर्दोष मतदार यादी सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा आत्मा असतो. ऊस न पुरविणारे व थकबाकीदार सभासदांचे सदस्यत्व कायम रहात असते. फक्त मतदानाचा अधिकार या सभासदांना नसतो. यामुळे सत्ताधारी व विरोधक या दोघाचेही सभासद मतदार कमी होणार आहेत. ऊस घातल्यानंतर व थकबाकी भरल्यानंतर त्या सभासदांना पुनश्च मतदानाचा अधिकार देण्यास कुठलीही हरकत नाही. ऊस न पुरविणारे ९९९० व थकबाकीदार ३३६३ असे एकूण १३३५२ सभासद असे आहेत कि त्यांना जर प्रति वर्षाला ७५ किलो साखर वाटप केली जाते. यामुळे कारखान्याचा पाच वर्षात सोळा कोटी दोन लाख चोवीस हजार एवढा तोटा प्रामाणिकपणे ऊस पुरविणारे सभासद आहेत त्यांना सहन करावा लागत आहे. यामुळे विद्यमान संचालक मंडळ हे ऊस उत्पादक सभासदांचे आहे का बिगर ऊस उत्पादक सभासदांचे आहे असा प्रश्न भेडसावत असल्याचे जाचक यांनी सांगितले.हे सर्व सभासद आपला ऊस इतर कारखान्याला जादा दराने देतात. यामुळे आपल्या कारखान्यास ऊस न मिळाल्याने त्याचा तोटा सहन करावा लागतो. कारखान्याचा होणारा तोटा स्पष्ट दिसत असताना सुद्धा संचालक मंडळ स्वताच्या स्वार्थासाठी कारखान्याच्या खर्चाने मतदान मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या पाच वर्षातील संचालक मंडळाचे कामकाज व कारखान्याची आर्थिक स्थिती सभासदांना स्पष्ट दिसत असतानासुद्धा सभासद यावेळी परीवर्तन करणार कि नाही हा कळीचा मुद्दा आहे.गेली तीन महिने कामगारांचे पगार झाले नाहीत,एफ.आर.पी. पुर्ण दिली नाही, कारखान्याचे गळीत चाळीस टक्के कार्यक्षमतेने चालु आहे असे असताना कारखान्यामध्ये प्रयोग करतच रहायचे का असा प्रश्न सध्या भेडसावत आहे असा आरोप जाचक यांनी केला आहे.

यावेळी बाळासाहेब कोळेकर,शिवाजी निंबाळकर,विशाल निंबाळकर,बाळासाहेब रायते,सतिश काटे,अँड.संभाजीराव काटे,बापुराव काटे आदी सभासद उपस्थीत होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा