शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा फोटो

37

नवी दिल्ली : ‘पॉलिटिकल किडा’ या ट्विटर हॅंडलवरुन व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा मॉर्फिंग करून दाखविण्यात आल्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे.
हा व्हिडिओ तानाजी चित्रपटाचा प्रोमो आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जागी अमित शहा असलेला चेहरा दाखविण्यात आला आहे.
दिल्ली निवडणुकांचा गड सर करण्यासाठी तानाजी म्हणजेच गृहमंत्री अमित शहा एकमेव पर्याय असल्याचे या व्हिडिओत दाखविण्यात आले आहे.
या घटनेमुळे सर्वच स्थरांतून मान्यवरांच्या तसेच शिवप्रेमींच्या तीव्र प्रतिक्रिया येत असून अनेकांनी या कृत्याचा निषेध केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी ‘ही चित्रफित मी संभाजी भिडेंपासून भाजपच्या सगळ्या नेत्यांना पाठवल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या विरोधात सातारा, सांगली बंद करणारे या व्हिडीओवर काय प्रतिक्रिया देतात हे पाहायला हवे’,असे म्हटले आहे.
या मॉर्फिंग प्रकरणामुळे सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. भाजपच्या सोशल मीडिया टीमकडून असे माँर्फिंग केलेले प्रोमो व्हायरल हात असल्याने यामागे भाजपचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, ही चित्रफित तत्काळ मागे न घेतल्यास गंभीर परिणाम होतील असा इशारा शिवप्रेमींकडून देण्यात आला आहे.