महाराष्ट्राची राजकीय मनस्थिती आता बदलली आहे. शिवसेनेचा जुना मित्र, भाजप आता त्याचा राजकीय शत्रू बनला आहे, तर एकेकाळी वैचारिक प्रतिस्पर्धी असलेला कॉंग्रेस-राष्ट्रवादी हा आजचा सर्वात मोठा सारथी आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांच्या राजकीय वारशाचा खरा वारस होण्याची लढाई तीव्र झाली आहे.
एकेकाळी मराठी माणूस आणि परप्रांतीयांवर आपली पक्षाची भूमिका कायम ठेवणारे राज ठाकरे आज चक्क हिंदुत्वाच्या दिशेने वळलेले दिसत आहेत. हिंदुत्वावर स्थापन झालेला शिवसेना पक्ष वेगळ्या विचारधारेने सत्तेत उभा आहे तर दुसरीकडे आपल्या पक्षाची राजकीय स्थिती मजबूत करण्यासाठी राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या झेंड्या सहित विचारांचाही मोर्चा दुसऱ्या दिशेने वळवल्याचे दिसत आहे.
सत्ता स्थापन होण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदुत्व बद्दल आपल्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडू शकत होते, परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत सत्तेत आल्यामुळे कदाचित शिवसेनेला हिंदुत्व वरून राजकारण करणे फारसे सोपे राहिले नाही. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष पुरोगामी विचारसरणीने वाटचाल करणारे आहेत. जर शिवसेनेला आपली सत्ता कायम ठेवायचे असेल तर शिवसेनेला देखील या दोन्ही पक्षांची आपली वैचारिक समानता ठेवणे गरजेचे असणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात तयार झालेली हिंदुत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी तसेच आपल्या पक्षाचे इंजिन राजकीय रुळावर पुन्हा आणण्यासाठी राज ठाकरे यांनी घेतलेला हा निर्णय केवळ राजकीय फायद्यासाठीच दिसत आहे. भाजप महाराष्ट्रातील पक्ष नाही त्यामुळे महाराष्ट्रातून हिंदुत्वाचे नेतृत्व करणारा इथला पक्ष आता मनसे झाला आहे.
शिवसेनेने आपली भूमिका बदलल्यामुळे शिवसेनेचे बरेचसे समर्थक नाराज झालेले आहेत हे राज ठाकरेंनी अचूकपणे ओळखले. त्याला अनुसरून बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी राज ठाकरेंनी ही घोषणा करत बाळासाहेबांचा वारसा पुढे न्हेनारा पक्ष आता मनसे असेल असे दाखवले आहे. राजकारणात राज ठाकरे यांनी खेळलेला हा डाव किती यशस्वी होतो हे आगामी काळात समजेलच.
ईश्वर वाघमारे