हक्काच्या पाण्यासाठी पंकजा मुंडे यांचे उपोषण

औरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी भाजपच्या वतीने आज माजी मंत्री पंकजा मुंडे या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणासाठी बसल्या आहेत.सरकारवर टीका करण्यासाठी नाही, तर मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी उपोषणाला बसले आहे, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले.
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणासाठी बसणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केली होती. त्यानुसार, त्या सकाळी १० वाजता उपोषणाला बसल्या आहेत. मुंडे यांच्यासोबत व्यासपीठावर रावसाहेब दानवे देखील आले आहेत. मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सुरू केलेल्या योजनांना गती द्या, अन्यथा पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन करु, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
मराठवाड्याला हक्काचे पाणी द्यावे, मराठवाडा विभागाचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी एक हजार कोटी रुपये अतिरिक्त द्यावेत. जलयुक्त शिवार योजना पुढे चालू ठेवावी आणि प्रभावीपणे राबवावी. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करावा. मराठवाड्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्याच्या त्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी. जायकवाडी धरणात पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी उपलब्ध करून कालव्याद्वारे सिंधफणा व वाण उपखोऱ्यांमध्ये सोडावे. अशी मागणी यावेळी मुंडे यांच्याकडून करण्यात येत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा