‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ प्रेक्षकांच्या भेटीला

44

मुंबई: बहुचर्चित ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या आगामी मराठी चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझर पाठोपाठ ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे.
पुण्यात लागलेल्या पोस्टरवरील बहुचर्चित सविता भाभी ही भूमिका दुसरं तिसरं कोणी नव्हे तर मराठीतील बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर साकारणार आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला मादक आवाजात सईची पहिली झलक तर शेवटी, किंचित झलक दाखवल्याने उत्सुकता वाढत आहे. चित्रपटाची कथा नेमकी काय आहे. याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
या चित्रपटाची निर्मिती गौरी आणि बनी डालमिया, सुरेश देशमाने, विनोद सातव यांनी केली आहे तर आर.आर.पी. कॉर्पोरेशन प्रा. लि. यांची प्रस्तुती आहे.
या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद धर्मकीर्ती सुमंत यांचे असून आलोक राजवाडे यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाचे संगीत साकेत कानेटकर यांनी केले आहे. तसेच आलोक राजवाडे, ऋतुराज शिंदे, विराट मडके, साकेत कानेटकर यांनी पार्श्वगायन केले आहे.
या चित्रपटाचे छायांकन सत्यजित शोभा श्रीराम यांनी केले असून संकलन मकरंद डंभारे यांनी केले आहे. तर ध्वनी संरचनेची जबाबदारी शिशिर चौसाळकर यांनी सांभाळली आहे.
या चित्रपटात अभिनेता अभय महाजन, अभिनेत्री पर्ण पेठे आणि सई ताम्हणकर यांची प्रमुख भूमिका आहे. तसेच सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अभिनेता अमेय वाघ देखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. शुक्रवारी ६ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.