बार्बी डॉल’ माहीत नाही असे एकही व्यक्ती सापडणार नाही. अतिशय नाजूक, निरागस डोळे असलेली ही बाहुली आपल्याजवळ असावी, असं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. मुलीच्या हाती एखादी चांगली बाहुली असावी, या विचारातूनच, रुथ हँडलर या उद्योजिका-आईने जन्म दिला बार्बी डॉलला.
आजच्याच ९ मार्च १९५९ रोजी ‘बार्बी’ या जगप्रसिध्द बाहुलीच्या विक्रिस सुरूवात करण्यात आली होती.
अमेरिकेतील डेन्वर, कोलेरॅडो मध्ये १९१६ साली जन्मलेल्या रुथ हँडलर यांनी केवळ घर सांभाळण्याबरोबरच आपल्या पतीच्या साहाय्याने मॅटल कॉर्पोरेशन नावाने कंपनी सुरु करून व्यवसाय करण्यास सुरूवात केली.
१९५६ साली हँडलर कुटुंबिय आपली दोन मुलं, बार्बरा आणि केनेथ यांच्यासह युरोपला फिरायला गेले. त्यावेळी जर्मनीमध्ये प्रसिध्द असलेली लीली डॉल रुथ यांनी विकत घेतली. छोट्या बार्बराला ही लीली भलतीच भावली.
लीलीचं रुप पाहून रुथला अमेरिकेमध्ये असं उत्पादन व्हावं, असं वाटू लागलं. परंतु ती केवळ बाहुली न राहता लहान मुलींबरोबरच किशोरवयीन मुलींना तो एक आदर्श वाटावा, अशी रुथ हँडलर यांची संकल्पना होती. त्यांनी त्यांच्या मॅटल कंपनीमध्ये जेव्हा हा विचार मांडला तेव्हा, तिच्या पतीसह कोणालाच ही संकल्पना आवडली नाही. अमेरिकेत अशाप्रकारची संकल्पना मूळ धरुच शकणार नाही, असं रुथ यांना कंपनीच्या बैठकीत सांगण्यात आलं.
शेवटी हट्टाला पेटलेल्या रुथ यांच्यासमोर कंपनीने हार पत्करली. ९ मार्च १९५९मध्ये अमेरिकन इंटरनॅशनल टॉय फेअरमध्ये ही बाहुली प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली. या बाहुलीचं नाव रुथ यांनी आपल्या मुलीच्याच नावावरुन बार्बी असं ठेवलं होतं. कंपनीतील अधिकाऱ्यांप्रमाणेच प्रदर्शनातील व्यावसायिकांना या बाहुलीत फारसा रस वाटला नाही. पण, प्रदर्शनासाठी आलेल्या लहान मुलींना मात्र या बाहुलीने वेड लावलं. त्यामुळे बार्बी आज जगातील अनेक मुलींची सखी झाली आहे. ज्या दिवशी प्रदर्शनात बार्बी सगळ्यांसमोर आली. तोच ९ मार्च बार्बीचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो.