मुंबई : परीक्षेच्या काळात मुलांसोबतच पालकांना देखील मोठ्या ताण-तणावाचा सामना करावा लागतो. या तणावापासून सुटका मिळविण्यासाठी पालकांनी काही गोष्टींचे पालन केले तर मुलांना देखील अभ्यासात मदत मिळू शकते.
परीक्षेच्या काळात मुलं तणावाखाली वावरत असतात. यावेळी त्यांचं खाण्या पिण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होते. त्यामुळे यावेळी पालकांनी त्यांच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे ठरेल.
अभ्यासाबाबत मुलांकडून काही चुका होत असतील तर, डोकं शांत ठेवून त्यांच्या चुकांचे निरसन करा. पॅनिक होऊन किंवा मुलांना रागावून त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. शिवाय त्यातून मुलांवरील अभ्यासाचा ताण आणखी वाढू शकतो.
आपल्या मुलांची कोणत्याही बाबतीत दुसऱ्यासोबत तुलना करणे चुकीचे आहे. अशाप्रकारे तुलना केल्यास मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे अशा गोष्टी करणे टाळणे गरजेचे आहे.
परीक्षेच्या काळात आपल्या पाल्याला शक्यतो स्मार्टफोन पासून दूर ठेवा.
मुलांसाठी सकारात्मक वातावरण तयार करा. मुले मनमोकळेपणाने जेवढा अभ्यास करतील, तेवढं त्यांच्या लक्षात राहणार आहे.
सततच्या अभ्यासातून थोडा ब्रेक देखील मिळणं गरजेचं आहे. मुलांच्या बुद्धीला आराम मिळण्यासाठी थोडावेळ त्यांना आवडीची काम करू द्या. त्यांचा मूड फ्रेश झाल्यास पुन्हा ते नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात करतील.