मुंबई : सध्या राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र खबरदारीचे उपाय योजले जात आहेत. यातच रेशन दुकानांतून “ई-पॉज” यंत्रणा सुरूच ठेवण्यात आल्याने दुकानदारांना भीतीने घाम फुटण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राज्यातील रेशन दुकानदार हैराण झाले आहेत.
सरकारने कर्मचार्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून ५ मार्चपासून बायोमेट्रिक मशीनवर अंगठा, बोटांचे ठसे उठवण्याचे धोरण बंद केलेले आहे. महावितरणासह इतर शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक मशीनवर अंगठा-बोट लावण्या ऐवजी रजिस्टरवर हजेरीच्या सह्या करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु रेशन दुकानदारांना कार्डधारकांची बोटे मशिनवर दाबून ठसे घ्यावे लागतात. यामुळे दुकानदार, तेथील कर्मचारी आणि रेशन कार्डधारकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकत नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पद्धत बंद करण्याची मागणी रेशन दुकानदारांकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील रास्त भाव धान्य दुकानांतील ई-पॉज मशिनवर बायोमेट्रिक थम्बचा वापर केला जात असून, लाखोंच्या संख्येने कार्डधारक त्यावर अंगठा लावत असल्यामुळे करोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे दुकानदार आणि कार्डधारकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून करोनाला दूर ठेवण्यासाठी शासनाने तात्काळ ई-पॉज मशिनवरील बायोमेट्रिक थम्बचा वापर बंद करण्याची मागणी न्युज अन कटशी बोलताना काही रेशन दुकानदारांनी केली आहे.