मुंबई, दि. २६ एप्रिल २०२०: राज्यात सर्वत्र कोरोनाचे सावट पसरले आहे. सरकार व पोलिस यंत्रणा वारंवार लोकांना घरातून बाहेर पडू नका असे आवाहन करत आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यां बरोबरच पोलिस देखील दिवस-रात्र नागरिकांच्या सेवेत सज्ज आहेत. लोकांनी बाहेर पडू नये म्हणून पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकाराने लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु काही लोकांना त्याचा फारसा फरक पडला नाही. अशा परिस्थितीमधे लोकांसाठी झटणारा एक पोलीस कर्मचारी कोरोनाच्या प्रादुर्भावाचा बळी ठरला आहे.
पोलीस हवालदार संदिप सुर्वे (५२) असे त्यांचे नाव असून ते मुंबईत पोलीस दलात कार्यरत होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कोरोनाशी लढा देत असताना त्यांचे निधन झाले आहे. यामुळे पोलीस दलाकडूनही दु:ख व्यक्त केले जात आहे. कोरोनाव्हायरसशी झुंज देताना प्राण गमावलेले ते महाराष्ट्रातील दुसरे पोलीस कर्मचारी आहेत या दुःखद प्रसंगी पोलीस महासंचालक व महाराष्ट्र पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांप्रति सहानुभूती व्यक्त करत आहेत.
आतापर्यंत राज्यात कोरोना मुळे दोन पोलीस कर्मचारी दगावले आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांबरोबरच वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आणि डॉक्टरांचा देखील या व्हायरस मुळे मृत्यू झाला आहे. एवढे होऊनही लोकांना या संकटाचे गांभिर्य कधी कळणार? पोलिसांच्या, डॉक्टरांच्या वेषातले जे देवदूत लोकांसाठी दिवस-रात्र राबवत आहेत त्यांचाच जीव आता धोक्यात आला आहे. ते सुरक्षित असतील तर आपण सुरक्षित आहोत आहे हे लोकांना आतातरी समजायला हवे अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी