सातारा : २७ एप्रिल २०२० : सातारा जिल्ह्यातील दहिवडी व गोंदवले बुद्रुक जवळच्या भवानवाडी भागातील वनक्षेत्राला शनिवारी (दि.२५) रोजी रात्री नऊच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची तीव्रता मोठी असल्याने सुमारे ४०० ते ५०० युवा कार्यकर्त्यांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर, तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. मात्र तोपर्यंत या आगीत २० ते २४ एकर क्षेत्रावरील वनविभागाचे आणि खाजगी मालकीचे क्षेत्र तसेच शेकडो वृक्ष जळून खाक झाले होते.
कोरोनामुळे अनेक नागरिक घरीच असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वनविभागाच्या क्षेत्राला लागलेल्या आगीचे लोट दिसू लागल्यावर दहिवडी, गोंदवले येथील परिसरातील युवा कार्यकर्ते अंगराज कट्टे, पंढरीनाथ जाधव, राजू मुळीक, हर्षद जाधव, जवान गणेश जाधव, जवान किरण जाधव, गौरव जाधव, सागर जाधव,अक्षय नाळे , अमर शेबंडे, शंभूराज जाधव, नवनाथ नाळे,अजित नाळे, गणेश घनवट अशा शेकडो तरुणांनी धाव घेऊन प्रसंगावधान राखत आगीवर सुमारे पाच ते सहा तासांनी नियंत्रण मिळवले.
यावेळी गोंदवले व परिसरातील या युवकांसह शेकडो युवकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. यावेळी अनेक युवकांना आग विझवताना, भुवया व कातडी जळून इजा झाली आहे.
सुमारे तीन किलोमीटर अंतरावरून आगीचे मोठे लोट दिसत होते. यावरून आगीचे रौद्र रूप लक्षात येते. मात्र वन विभागाने ही फारशी गंभीर बाब नसल्याचे सांगितल्याने आश्चआर्य व्यक्त होत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी