कोरोनामुळे ग्रामीण भागात अंत्यविधीकडे नातेवाईकांची पाठ

9

बारामती : २७ एप्रिल २०२० : सध्या कोरोना या विषाणूजन्य आजाराने जगभर थैमान घातले आहे. कोरोना हा आजार झपाट्याने पसरत आहे. यामुळे त्याचा प्रसार रोखण्याकरिता संपूर्ण भारतातील सर्व राज्यात कलम १४४ लागू केले आहे. संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी कडक कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. काहीतरी निमीत्त काढून जे बाहेर पडत आहेत त्यांना पोलिसांच्या काठीने प्रसाद मिळत असुन त्यांची वाहने जप्त करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे काहीजण घरात बसून राहणेच पसंत करत आहेत.
कोरोना पसरण्याच्या आधी गावातील किंवा बाहेरील नातलगांची मयत झाली तर मोठ्या संख्येने लोक अंत्यविधी, सावडणे तसेच दशक्रियाविधीसाठी उपस्थित असायचे. परंतु सध्याच्या कालावधीत, शेजारील किंवा आसपासच्या गावात राहत असणा-या नातेवाईकाचा आजाराने किंवा वयोमानाने मृत्यू झाला तर त्यांच्या अंत्यविधी, दशक्रिया विधीकडे आता त्यांचे नातेवाईक, भावकी, मित्रपरिवार, गावातील राजकीय व्यक्ती तसेच विविध क्षेत्रातील लोकांनी पाठ फिरवल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून आले आहे.
सध्याच्या स्थितीत गावात एखादी मयत झाली असली तर त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन आणि गावातील पोलीस पाटील, गर्दी होणार नाही यांची दखल घेतच आहेत. परंतु त्या ठिकाणचे ग्रामस्थही मयतीला जाण्याचे टाळताना दिसून येत आहे. सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे ज्या घरात मयत होत आहे, तेच आता मयतीचा विधी उरकून, स्वतःच स्वतःचे सांत्वन करुन घेत असल्याची परिस्थिती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील कुटुंबाचे नातेवाईक शहरात राहत असल्यास त्यांनाही मयत झाल्याचे केवळ फोनवर कळवले जात आहे. नातेवाईक कोरोनाच्या भीतीने येणे टाळत असल्याने घरातील मोजकेच पाच-दहा नातेवाईक आणि शेजारील काही लोक मिळून ग्रामीण भागातील मयत विधी उरकून घेत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव