मुंबई, २८ एप्रिल २०२०:
पालघरमध्ये चोर आल्याची अफवा उठल्याने जमावाने दोन साधूंची हत्या केली होती. त्यावरून भाजपने राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. आता त्या नंतर पुन्हा उत्तर प्रदेशात दोन साधूंची हत्या झाल्याचं वृत्त आल्यानंतर संजय राऊत यांनी त्यावरून भाजपला टोले लगावले आहेत. यावरूनही राजकारण करू नका असे त्यांनी भाजपला सांगितले आहे.
राऊत यांनी आपल्या ट्विटरवरून हा टोला लगावला आहे. ते म्हणाले, ‘उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन साधूची हत्या झाली आहे. हे अत्यंत निर्घृण आणि अमानुष आहे. पण सर्व संबंधितांनी या विषयाचं पालघरप्रमाणे राजकारण करू नये. देश करोनाशी लढत आहे. शांतता राखा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतीलच.
पालघर प्रकरणी भाजपने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटनेवरून एक पत्रकार देखील चर्चेत राहिला आहे. परंतु त्याची पुनरावृत्ती होऊ नये असे सूचक ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. याचबरोबर उद्धव ठाकरे यांनीही योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर बोलणे करून या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली व आम्ही तुमच्यासोबत आहोत असे सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी