पुरंदर, दि. २ मे २०२० : कोरोना विरुध्दच्या लढ्यासाठी, पुरंदर तालुक्यातील केंद्रप्रमुख व प्राथमिक शिक्षकांनी उर्त्स्फुतपणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केलेली भरघोस आर्थिक मदत आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी काढले.
पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नवलकिशोर राम यांच्याकडे, पुरंदर पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे व पुरंदर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांना, पुरंदरच्या प्राथमिक शिक्षकांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११,८८,१४१ रुपयांचा मदतनिधीचा धनादेश सुपुर्त करण्यात आला.
यावेळी उद्योजक हरिभाऊ लोळे, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी सुनील लोणकर, गणेश लवांडे, शामकुमार मेमाणे, संदिप कदम, नंदकुमार चव्हाण उपस्थित होते. कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले आहे. त्याविरुद्ध लढ्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सध्या राज्य शासनाकडून नागरिकांसाठी विविध उपाय योजना व सोईसुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पुरंदर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख व प्राथमिक शिक्षकांना मुख्यमंत्री सहायता निधीला एक दिवसाचे वेतन देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पुरंदर तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख व प्राथमिक शिक्षकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे ११,८८,१४१ रु. इतका भरघोस निधी जमा झाला.
शासन आदेश नसतानादेखील महाराष्ट्रात प्रथमच पुरंदरच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या भरघोस आर्थिक मदतीनिधीची माहिती गट शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे, पुरंदरचे आमदार संजय जगताप, प्रांताधिकारी प्रविण गायकवाड, शिक्षणाधिकारी सुनील कु-हाडे, पोलिस उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव,तहसिलदार रुपाली सरनोबत, गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, पोलिस निरीक्षक डी. एस. हाके यांना दिली. या सर्वांनी पुरंदरच्या वेगळेपण जपणा-या, शिक्षण विभाग व सर्व प्राथमिक शिक्षकांचे अभिनंदन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे