गरजू रुग्णांसाठी ‘साई श्री’ रुग्णालयाचा मदतीचा हात

18

पुणे, दि. ३ मे २०२० : पुण्यातील औंध येथील साई श्री रुग्णालयाने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. यातून गरिबांना मोलाची मदत होणार असल्याचे डॉ. नीरज अडकर (मॅनेजिंग डायरेक्टर साई श्री हॉस्पिटल) यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या काळात सर्व सरकारी रुग्णालये व्यस्त आहेत. गरीब कुटुंबातील बहुतांश लोक अश्या रुग्णालयात आपले उपचार करत असतात. परंतु आत्ता सध्याची परिस्थिती पाहता अशा रुग्णालयांमध्ये उपचार घेणे अशक्य आहे.

अशी आहे ‘अक्षय योजना’:

मुळात ‘साई श्री’ हे हाडांच्या रोगांवरील रुग्णालय आहे. अपघातामध्ये दुखापत झालेले, मणक्याचा त्रास असणारे किंवा हाडांविषयी इतर आजार असणाऱ्या रुग्णांना घरी भरपूर त्रास आणि वेदना होत असतात. अशा गरीब आणि त्रस्त रुग्णांसाठी साई श्री रुग्णालयाने ‘अक्षय योजना’ मार्फत मोफत रुग्णालय सेवा देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

या सवलती मिळणार :

या योजनेअंतर्गत हाडांचा त्रास असणाऱ्या रुग्णांना जनरल वॉर्डमध्ये मोफत सेवा दिली जाईल. या मोफत सेवेमध्ये तज्ञ डॉक्टरांची फी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची फी, रुग्णालयाचे भाडे, शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञांची घेतली जाणारी फी, भूल देणाऱ्या तज्ञ डॉक्टरांचे पैसे म्हणजेच थोडक्यात रुग्णालाया संबंधित सेवेबद्दल कोणतेही पैसे घेतले जाणार नाही. परंतु, रुग्णाला लागणारी औषधे, हाडांच्या शस्त्रक्रियेदरम्यान लागणारे कृत्रिम अवयव (रॉड्स, स्टेट्स, स्क्रू) आणि कोणती तपासणी करायची असल्यास फक्त त्याचे पैसे भरावे लागतील.
सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन साई श्री रुग्णालयाने हे पाऊल उचलले आहे. तसेच या योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू रुग्णांना व्हावा यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे आणि लोकांनी ती पोहोचवावी असे आवाहन डॉक्टर नीरज अडकार यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे