पुणे, दि. ४ मे २०२०: आज पासून ३ रे लॉकडाऊन सुरू होत आहे. या लॉकडाऊनचा कालावधी १७ मे पर्यंत असणार आहे. या अनुषंगाने सरकारने नवीन नियम लागू केले आहेत व काही शिथिलता ही देण्यात आली आहे. काय आहेत हे सुधारित नियम जाणून घेऊया.
कंटेन्टमेंट झोन वगळता दुकाने चालू:
राज्यातील कोविड १९ चा प्रभाव असलेले कंटेन्टमेंट झोन वगळता इतर भागातील जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल (स्टँड अलोन) दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाची मान्यता. यात इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, स्टेशनरी, मद्य यांच्यासह इतर दुकानांना हाच नियम लागू असणार.
कंटेन्टमेंट झोनमध्ये पूर्वीप्रमाणेच सर्व निर्बंध कायम राहतील. जीवनावश्यक वस्तू नसलेली एकल दुकाने, बांधकाम ही बंद राहतील. कंटेन्टमेंट झोनमधील ब्युटीपार्लर, केशकर्तनालय, सलून व स्पा सुरू करण्यास अद्याप निर्बंध. रेडझोनसह इतर झोनमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी.
कंटेन्टमेंट झोन वगळता रेड झोन मध्ये दुकाने शर्यतीसह चालू :
ऑरेंज व ग्रीन झोन व्यक्तिरिक्त कंटेन्टमेंट झोन वगळता इतर रेड झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांबरोबरच रस्त्याच्या एका बाजूकडील (एका लेनमधील) जीवनावश्यक वस्तू नसलेली स्वतंत्रपणे असलेली पाच दुकाने (स्टँड अलोन) सुरू करण्यास परवानगी.
या पाच दुकानांमध्ये मध्ये विक्रीच्या दुकानांचा समावेश असणार आहे. मात्र, एका लेनमध्ये पाचपेक्षा जास्त जीवनावश्यक नसलेली दुकाने सुरू करता येणार नाहीत. सोशल डिस्टंन्सिंग, गर्दी न करणे यासारख्या नियमांचे कडकपणे पालन करणे आवश्यक. तसेच शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, बाजार यामधील दुकाने बंदच राहतील.
एकल दुकाने म्हणजे काय?
एकल दुकाने याचा अर्थ ज्या वस्तीत एका ठिकाणी लागून पाच पेक्षा जास्त दुकाने नाहीत, अशी दुकाने. कोणते दुकान एकल आहे? याचा निर्णय स्थानिक प्रशासन करील. मुंबईमध्ये कंटेन्टमेंट झोन असल्यामुळे मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या मजुरांसाठी कोणतीही रेल्वे सोडण्यात येणार नाही.
पुणे, मुंबईत उद्योग सुरू करण्यास परवानगी नाही:
मुंबई महानगर प्रदेशातील महानगरपालिकांसह पुणे, पिंपरी चिंचवड व मालेगाव महानगरपालिका हद्दीत उद्योग सुरू करण्यास अद्याप परवानगी नाही. येथील खासगी कार्यालयेही बंदच राहणार. मात्र, या व्यक्तिरिक्त असलेल्या रेड, ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये काही अटींवर खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी. रेडझोनमध्ये शासकीय कार्यालये ही पूर्वीप्रमाणे ५ टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील. तसेच ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये ३३ टक्के कर्मचाऱ्यांसह खासगी व शासकीय कार्यालये सुरू राहतील.
मुंबई, पुण्यात बांधकामास परवानगी नाही:
रेड झोनमध्ये मर्यादित प्रमाणात उद्योग सुरू करण्याची तसेच बांधकाम करण्याची परवानगी मात्र मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात ही परवानगी नसेल. बांधकामांना परवानगी असलेल्या इतर रेड झोन भागात बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणीच राहण्याची सोय असणे बंधनकारक.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे