नवी दिल्ली , दि. ६ मे २०२० : लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून इंधनावरील उत्पादन शुल्कात चांगलीच वाढ करण्यात आली आहे. आता पेट्रोलचे दर प्रति लिटर १० रुपये वाढविण्यात आले असून डिझेलच्या दरात प्रति लिटर १३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र या वाढीने किरकोळ किमतीत बदल होणार नसून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार नसल्याचे पेट्रोल मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
ही दरवाढ केल्याने केंद्राच्या उत्पादन शुल्कात जवळपास एक लाख ६० हजार कोटींचा अतिरिक्त महसूल मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने याचा भार तेल कंपन्यांना सोसावा लागणार आहे. अशी माहितीही सूत्रांकडून मिळत आहे.
याबाबत केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात प्रतिलिटर २ रुपये आणि रस्ते उपकरामध्ये (रोड सेस) ८ रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ५ रुपये आणि रस्ते उपकरामध्ये ८ रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात आली आहे. अशी माहितीही देण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: