राज्यात अडकलेल्या लोकांसाठी मोफत १० हजार एसटी बस

मुंबई, दि. ६ मे २०२०: महाराष्ट्रात अडकलेल्या लोकांना आपापल्या जिल्ह्यातील गावी पोहोचवण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून एसटी महामंडळाला निधी उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचे आणि पुढच्या दोन-तीन दिवसांत या माध्यमातून जवळपास १० हजार बसेस सोडून या अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी सोडवण्याचा निर्णय घेतला असल्याचे वडेट्टीवार यांनी आज सांगितले.

राज्यातील विविध भागात लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या लोकांना त्यांच्या जिल्ह्यातल्या गावी पोहोचवण्यासाठी १० हजार एसटी बस सोडण्यात येणार आहेत. याबरोबर ते म्हणाले की, यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून एसटी महामंडळाला निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. पुढच्या तीन दिवसात हे कार्य सुरू होणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

याबाबत संबंधित जिल्हा प्रशासनाची माहिती, स्क्रिनिंगचं काम, गरज पडल्यास करोनाची लक्षणं आढळून आलेल्यांना संस्थात्मक क्वारंटाइन करणं, या बाबींची चर्चाही झाली आहे. त्यानंतर पुढच्या चार-पाच दिवसांत मुंबई, पुणे किंवा इतर जिल्ह्यांमध्ये अडकलेले विद्यार्थी, नातेवाईकांकडे गेलेले लोक, मजूर या सर्वांना त्यांच्या गावापर्यंत मोफत पोहचवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या लोकांना तिकीटाचा कुठलाही भुर्दंड पडणार नाही, अशी भुमिका घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला केल्या आहेत, अशी माहितीही वडेट्टीवार यांनी दिली.

गडचिरोली जिल्ह्या बाबत देखील चर्चा:

गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या सहकार्यामुळे आणि प्रशासनाच्या नियोजित कार्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. निश्चितच एक आनंदाची गोष्ट आहे. भविष्यातही हा जिल्हा कोरोना मुक्त राहण्यासाठी जनतेकडून सहकार्याची अपेक्षा आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये तेलंगाना व आसपासच्या राज्यातून जवळपास चौदा हजार मजूर येणार आहेत. यासंदर्भात जिल्ह्यातील जनतेला सुरक्षित ठेवणे आणि त्यांच्याबाबत काळजी घेणे याबाबत आज या सभेमध्ये चर्चा झाली असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा