इंदापूर तालुक्यात वाढले सावकारकीचे लोन

इंदापूर, दि.७ मे २०२०: इंदापूर तालुक्याला कृषी , सहकार आणि औद्योगिक क्षेत्रामुळे आर्थिक सुबत्ता लाभली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात विशेषतः उजनी पाणलोट क्षेत्रात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तसेच कृषी क्षेत्राशी निगडित व्यवसायाने येथील लोकांची आर्थिक बाजू मजबूत केली आहे. त्यातच तालुक्यात असलेल्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक धनदांडग्या लोकांनी ठेकेदारी करत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यातूनच सावकारकीचे लोन वाढत चालले आहे.

इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावात वाड्या-वस्त्यांवर किमान पाच पंचवीस अवैध  सावकार आहेत. अश्या प्रकारे तालुक्यातील गावात किमान हजारो सावकार अवैधरित्या आपला धंदा राजरोपणे चालवताना दिसत आहे. यातूनच काही पीडितांनी सावकारकीच्या जाचातून आपले आयुष्य संपवले आहे.

सध्या कोरोनामुळे सगळे ठप्प झाले आहे. पावसाने दिलेली ओढ आणि त्यातच बँकांच्या जाचक अटी यामुळे सहजपणे अगदी काही दिवसात सावकारमार्फत उपलब्ध होणारे कर्ज यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील लोक याला बळी पडत आहेत.

सहकार खात्याकडून सावकारकीचे अधिकृत परवाना घेतलेले केवळ ६६ सावकार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक अनिल खंडागळे यांनी दिली. यामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अच्छाद माजवला आहे. त्यातच वाळू माफियांनी देखील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.अगदी काही दिवसात ते मुद्दलाच्या दुप्पट रक्कम व्याज स्वरूपात वसूल करत आहेत.व्याज वसूल करण्याच्या अनेक कल्पृक्त्या ते आजमावताना दिसत आहेत. इंदापुरात दरमहा २५ ते ३० टक्के व्याजाने घेणारेही अनेकजण आहेत. आलिशान बंगला, चारचाकी गाडी, अंगावर १५ ते २० तोळे सोने घालून ही मंडळी वावरताना दिसत आहे.सावकाराच्या जाचाला कंटाळून इंदापूर तालुक्यातील अनेक जणांनी आत्महत्या केल्या आहेत.

अनेक सावकारांवर गंभीर गुन्हे देखील नोंद आहेत, तर काही जणांनी तुरुंगाची हवा सुद्धा खाल्ली आहे. मात्र काही मातब्बर  सावकारांनी तुरुंगाची हवा खाऊन सुद्धा आपला धंदा जोमाने  ठेवला आहे. काही सावकारांना राजकीय वरदहस्त देखील आहे. त्यामुळे सहसा कुणी पोलिसांकडे तक्रार करण्यास धजावत नाहीत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा