नवी दिल्ली, दि. ७ मे २०२०: फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो, ऑनलाइन ऑर्डरद्वारे लोकांच्या दारात दारू पोहोचविण्याची तयारी करत आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान देशात दारूचा व्यवसाय सुरू झाला असून दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा फायदा कंपनीला घ्यायचा आहे.
कंपनीचा प्रस्ताव असा आहे:
वृत्तसंस्था रायटर्सच्या वृत्तानुसार, कंपनीने यासाठी आंतरराष्ट्रीय स्पिरिट्स अँड वाईन असोसिएशन ऑफ इंडिया (आयएसडब्ल्यूएआय) यांना ऑफर दिली आहे. लॉकडाऊनमुळे कंपनीचा अन्न वितरण व्यवसाय मोठ्या प्रमाणात घसरला आहे, म्हणूनच हा नवा व्यवसाय सुरू करून कंपनीला अस्तित्व टिकवून ठेवायचे आहे. नुकतेच झोमॅटो ने किराणा पुरवठा देखील सुरू केला आहे.
देशातील लॉकडाऊनचा पहिला टप्पा २५ मार्च रोजी सुरू झाला. त्यानंतर दारूचा व्यवसाय पूर्णपणे बंद राहिला. परंतु राज्य सरकार महसूलाअभावी दारूचा व्यवसाय उघडण्यासाठी दबाव आणत होते. यामुळे केंद्र सरकारकडून लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात ४ मे रोजी दारूचा व्यवसाय सुरू झाला. दारूचा व्यवसाय सुरू होताच, देशातील दुकानांवर प्रचंड गर्दी आणि लांब रांगा लागण्याच्या बातम्या येऊ लागल्या.
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे भारतात सध्या दारूची घरपोच परवानगी नाही. यासाठी कंपन्या सरकारवर सवलत देण्यासाठी दबाव आणत आहेत. जर ही सूट दिली गेली तर झोमॅटो अल्कोहोलची होम डिलीव्हरी सुरू करू शकेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी