बारामती, दि.१० मे २०२०: पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शरद भोजन योजनेंतर्गत इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथे धान्य वाटपास सुरुवात करण्यात आली आहे.अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रविण माने यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे श्रमजीवी व भटके नागरिकांवर त्याचा अधिक परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात आली आहे. धान्य वाटप सुरू होत असताना, गरजू – गोरगरीब आहेत, परंतू ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, अशांना हे धान्य वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्यांच्याकडे आधारकार्ड किंवा शिधापत्रिका आहे. मात्र दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवासी आहे यांनाही धान्य वाटप करण्यात आले.
या योजनेंतर्गत कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना ३ किलो गहू व २ किलो तांदळाचे वाटप करण्यात आले. तसेच तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांच्या माध्यमातून प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहचवला जाईल, असे माने यांनी सांगितले.
या धान्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी लोणी देवकर गावचे सरपंच पप्पू तोरवे, उपसरपंच विजय डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य कैलास तोंडे, विजयबाबा डोंगरे, अनिल थोरात, ग्रामसेवक भाऊसाहेब शिंदे उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव