लातूर, दि.१० मे २०२०: औसा तालुक्यातील लोदगा गावचे सुपुत्र गणपत सुरेश लांडगे हे सियाचीन येथे कर्तव्य बजावत असताना शहीद झालेले जवान गणपत लांडगे यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळगावी लोदगा येथे शासकिय इतमामात आज (रविवारी) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
सकाळच्या वेळी पाऊस असताना ही शहीद जवानास अखेरचा सलाम देण्यासाठी गर्दी झाली होती.
गणपत लांडगे हे २०१३ साली भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते सिक्स महार बोर्डर्स बटालियनमध्ये कार्यरत होते. सियाचीन येथे असताना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांना श्वसनाचा त्रास झाला होता. त्यात त्यांना दि ६ मे रोजी वीरमरण आले आहे. वातावरण व विमानातील बिघाड व कोरोना पार्श्वभूमीवर शहीद गणपत लांडगे यांचे पार्थिव मूळगावी येण्यास तब्बल पाच दिवस वाट पहावी लागली .
आज सकाळी पाच वाजता पुण्यावरून मोटारीने त्यांचे पार्थिव लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील लोदगा या मूळगावी आणण्यात आले.
काही काळ पार्थिव घरी ठेवल्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहीद गणपत जाधव यांच्या पार्थिवास त्यांचे बंधूनी भडाग्नि दिला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षांचा मुलगा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.
शहीद गणपत लांडगे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी खासदार ओमराजे निबांळकर, आमदार अभिमन्यू पवार , माजी आमदार पाशा पटेल , लातूरचे पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओंकार कोंम्पले , औसा -रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे , औशाच्या तहसीलदार शोभा पुजारी उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले , लोदगाचे सरपंच गोपाळ पाटील यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: