मद्याची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

पुरंदर , दि.११ मे २०२० : सातारा जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने पुणे जिल्ह्यातील नीरा येथील वाइन शॉप व देशी गुत्यावर जिल्हाबंदीचा आदेश मोडून मोठ्या प्रमाणात येत आहेत. यातील बरेच लोक केवळ मद्य खरेदी साठी येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा बंदी आदेश डावलून अवैध व बेकायदेशीर पद्धतीने मद्य बाळगल्या प्रकरणी रविवारी नीरा पोलीसांनी धडक कारवाई करत ९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल व सातारा जिल्ह्यातील दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. या धडक कारवाईमुळे नीरा परिसरातील लोकांनी नीरा पोलीसांचे कौतुक केले आहे.

नीरा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार. नीरा दुरक्षेत्राचे फौजदार विजय वाघमारे, हवालदार राजेंद्र भापकर, कॉन्स्टेबल प्रविण शेंडे, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर खाजगी वाहनाने नीरा शहरात गस्त घालत असताना एका व्यक्तीने फोन करून सांगितले की, नीरा नदीच्या काठावरील पालखी तळावर काही लोक संशयीत हलचाली करताना दिसत आहेत. वाघमारे यांनी गाडीचालकास तातडीने गाडी पालखी तळाकडे घेण्याचे आदेश दिले. हेडकॉन्स्टेबल सुदर्शन होळकर व कॉन्स्टेबल निलेश जाधव यांना दुचाकीवरून येण्याचे सांगितले. दोन्ही वाहने पालखी तळावर एकाच वेळी दाखल झाल्याने संशयित व्यक्तींना शंका आल्याने त्यांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला. पण होळकर व जाधव यांनी दुचाकीवरून पाठलाग करत फिल्मी स्टाईलने दोन व्यक्तींना ताब्यात घेतले.

नीरा येथील देशी विदेशी मद्याच्या दुकानातून एका व्यक्तीला जादा प्रमाणात मद्याच्या बाटल्या दिल्याचे निदर्शनास आले आहे. मद्याचा परवाना किंवा ही व्यक्ती कुठल्या जिल्ह्यातील आहे हे न पाहता सर्रास मद्य विक्री सुरू होती. उमेश संजय खोमणे रा. साखरवाडी, ता.फलटण, करण विठ्ठल बोडरे रा.पिंपळवाडी, ता.फलटण जिल्हा.सातारा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यांच्याकडे देशी मद्याच्या १८० मिलीच्या १५३ व विदेशी मद्याच्या १८० मिलीच्या १२ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. हा सर्व माल वाहतुकीसाठीचा परवाना न घेता जिल्हाबंदीचा आदेश डावलून अवैध पद्धतीने पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करत असताना त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात येऊन कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या बाबत कॉन्स्टेबल निलेश जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे .

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा