पोलीस कर्मचारी सानप यांच्या आत्महत्येचे गुढ कायम

10

बारामती, दि.१२मे २०२०: बारामती शहर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी तुषार सानप ( वय २६) यांच्या आत्महत्येचे गुढ कायम आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांनी नेमकी कोणत्या कारणावरून आत्महत्या केली असावी, याबाबत बारामतीत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
शहर पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी दादासाहेब डोईफोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार सोमवारी उपविभागीय पोलिस
अधिका-यांनी कोविड -४४ या टीममधील सर्व कर्मचा-यांना वाॅकीटाॅकीवरून काॅल दिला. परंतू तुषार सानप यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला असता तो उचलला जात नव्हता. दरम्यानच्या काळात तुषार यांच्या आई सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधत होत्या. परंतू कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी तुषार यांच्या काही पोलिस मित्रांशी संपर्क केला. तुषार फोन उचलत नाही, रुमवर जावून बघा, असे त्यांनी सांगितले.

त्यानुसार डोईफोडे व अन्य कर्मचारी पोलिस लाईनमधील त्यांच्या घरी गेले असता समोरचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. एका लहान मुलाला बोलावून घेत त्याला आतमध्ये हात घालायला सांगत कडी काढण्यात आली. आतमध्ये प्रवेश केला असता सानप यांनी पंख्याला दोरी बांधून गळफास घेतल्याचे दिसून आले. डोईफोडे यांनी ही बाब शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अौदुंबर पाटील यांना तात्काळ कळवली.
दरम्यान पोलिस लाईनमध्ये अनेक पोलिसांची कुटुंबे राहतात. अत्यंत तरुण वयाचे सानप हे आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतील याची कोणालाही पुसटशीही कल्पना आली नाही. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणावरून आत्महत्या केली याबाबत चर्चा सुरु आहेत. दरम्यान पोलिसांनाही या प्रकाराचा धक्का बसला आहे. सोमवारी रात्री उशीरा सर्व सोपस्कार पूर्ण केल्याने अद्याप या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झालेली नाही. सानप यांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या आत्महत्येमागील गुढ उकलण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:अमोल यादव