पुणे, दि. १४ मे २०२०: कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे देशात २४ मार्च पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांचे घराबाहेर पडणे प्रतिबंधित आहे. केवळ जीवनावश्यक गोष्टींसाठी बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांसाठी उरलेले अन्न पदार्थ मिळणे सुद्धा कठीण झाले आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या या मोकाट जनावरांच्या पोटाची खळगी लोकांनी टाकलेल्या अन्नातूनच भरते, परंतू आता तेही मिळणे बंद झाले असल्यामुळे त्यांची उपासमार होण्यास सुरूवात झाली आहे.
याची जाणीव राखून काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अशा मोकाट जनावरांसाठी मदत कार्य सुरू केले आहे. ‘ह्यूमन फॉर ॲनिमल’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा हा समूह रस्त्यावर फिरत असणारे कुत्रे, गाई, मांजर किंवा इतर प्राण्यांना रोजचे जेवण, त्यांच्या जखमांवरती उपचार, आवश्यक असल्यास जनावरांच्या डॉक्टरांना देखील बोलावले जाते. हे मदत कार्य पुण्यातील टिंगरे नगर, धानवडी व आसपासच्या भागांमध्ये केले जात आहे.
विद्यार्थ्यांच्या समूहांमध्ये जवळपास २० सदस्य आहेत. जे स्वखर्चातून हे मदत कार्य करत आहेत. जनतेने देखील या मदत कार्यास मदत करावी अशी विनंती या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. आतापर्यंत तब्बल २०० प्राण्यांना ह्यूमन फॉर ॲनिमल तर्फे मदत करण्यात आली आहे. लॉकडाउन मध्ये माणसांप्रमाणेच मुक्या जनावरांचे देखील प्रचंड हाल होत आहे याकडे ह्यूमन फॉर ॲनिमल या संघटनेने लक्ष वेधण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कार्यात लोकांकडून देखील मदत होईल अशी अपेक्षा ते बाळगून आहेत. त्यासाठी जनतेने स्वतः पुढे येऊन अडचणीत असलेल्या या मोकाट जनावरांना मदत करावी अशी विनंती त्यांनी केली आहे.
या विद्यार्थ्यांच्या समूहाला मदत करावयाची असल्यास अतिरिक्त माहितीसाठी ८२३७०९०००२ (सृष्टी काकडे) या क्रमांकावर संपर्क साधावा.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे