सीबीएसईकडून ९ वी आणि ११ वीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेसाठी संधी

नवी दिल्ली, दि. १५ मे २०२०: कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नववी आणि अकरावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षा देण्याची संधी मिळावी असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सीबीएसईला सांगितले होते. त्यानुसार सीबीएसईने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

संपूर्ण देश कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत आहे,असे सीबीएसईने आपल्या  अधिसूचनेत म्हटले आहे. मुलांना घरातच थांबणे भाग आहे. त्यांच्या शाळा बंद आहेत. मानसिक तणाव आणि चिंतेचा सामना ती करत आहेत. पालकांना वेतन, कुटुंबाचे आरोग्य इत्यादींबद्दल चिंता भेडसावत आहे. या कठीण काळात, जी मुले शाळेच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकलेली नाहीत त्यांना अधिक त्रास होईल. असे विद्यार्थी सीबीएसईकडे सतत विचारणा करत आहेत.  पालकांकडूनही चिंता व्यक्त केली जात  आहे. अशा कठीण वेळी विद्यार्थ्यांना तणावातून मुक्त करण्यासाठी आणि त्यांची चिंता कमी करण्यासाठी आपण सर्वानी मिळून प्रयत्न करावे लागतील, असे सीबीएसईने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

या असामान्य परिस्थितीत पालक आणि विद्यार्थ्यांची विनंती लक्षात घेऊन नववी आणि अकरावीच्या सर्व नापास विद्यार्थ्यांना पुन्हा शाळा-आधारित परीक्षा देण्याची संधी पुरवण्याचा निर्णय  सीबीएसईने घेतला आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्ण झाली आहे की नाही याचा विचार न करता, परीक्षेचा निकाल जाहीर झाला असला तरी संधी दिली जाईल. विषयांची संख्या कितीही असली तरी संधी दिली जाईल, असे सीबीएसईने म्हटले आहे.

अशा विद्यार्थ्यांसाठी उपाय म्हणून शाळा ऑनलाइन / ऑफलाइन / नाविन्यपूर्ण पद्धतीने चाचण्या घेऊ शकतात आणि या परीक्षेच्या आधारे उन्नतीबाबत निर्णय घेऊ शकतात. विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेल्या कुठल्याही  विषयांसाठी  ही चाचणी घेता येऊ शकेल. परीक्षा घेण्यापूर्वी शाळा विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ देतील. सीबीएसईशी संलग्न सर्व शाळा ज्या विषयात विद्यार्थी नापास झाले आहेत अशा सर्व विषयांसाठी नववी आणि अकरावीच्या सर्व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देतील. या अधिसूचनेच्या आधी जरी विद्यार्थ्यांना  संधी देण्यात आली असेल  तरी  ही संधी सर्व विद्यार्थ्यांना  देण्यात यावी असे या अधिसूचनेद्वारे पुन्हा सांगण्यात येत आहे.

कोविड-१९ च्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे केवळ चालू वर्षातच ही एक संधी दिली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा