बारामती, दि.१६ मे २०२०: बारामती येथे व्हिडिओ शूटिंगचा वाद विकोपाला गेल्याने पोलीस आणि वकिल यांच्यात जोरदार हाणामारीची घटना आज ( शुक्रवारी) बारामती न्यायालयाच्या आवारात घडली. अखेर वरिष्ठ अधिकारी व नेतेमंडळींच्या मध्यस्थीने पोलीस आणि वकील यांच्यातील वादावर पडदा पाडण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भाजपचे नेते प्रशांत सातव यांच्यासह अन्य कही कार्यकर्त्यांवर (दि.१४ )रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयीन कामकाजासाठी आज (शुक्रवारी) त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते.
यावेळी न्यायालयाच्या आवारात व्हिडिओ शूटिंग करत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यास वकिलांनी विरोध केला. बेकायदा शूटिंग करू नये असे पोलिस कर्मचाऱ्याला वकीलांकडून सांगण्यात आले. मात्र या किरकोळ कारणावरून पोलीस आणि वकील यांच्यात चांगलीच वादावादी झाली.
त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर हे न्यायालयात हजर झाले. यावेळी अॅड राजेंद्र काळे, नितीन भामे व इतर वकिलांनी ही बाब पोलीस अधिकारी शिरगावकर यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र या चर्चा टोकाला गेल्याने दोघांच्यात शाब्दिक चकमक तसेच शिवीगाळ होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
त्यानंतर पोलिसांनी काही वकिलांना ताब्यात घेतले. पोलीस अधिकारी कायद्याचा गैरवापर करत असल्याचे आरोप यावेळी वकिलांनी केला.
उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्यासह इतर पोलिसांवरही कारवाईची जोरदार मागणी वकिलांनी केली. अखेर वरिष्ठांच्या मध्यस्थीने वकील आणि पोलिस यांच्यातील वाद मिटवण्यात आला. घडली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर