मुंबई, दि.१८ मे २०२० : कोरोनाच्या संकटात पोलीस दलातील प्रत्येक जण परिस्थितीवर मात करत कर्तव्य बजावत आहे. असे कर्तव्य बजावताना आतापर्यंत ११ पोलिसांना वीर मरण आले आहे. कोरोनाच्या संकटात बजावलेल्या कर्तव्याची पोलीस खात्याच्या इतिहासात नोंद होत असताना पोलीस नाईक रेहना नासिर शेख(बागवान) (बक्कल नं.००५४९ ) यांच्या रूपाने आणखी एक सुवर्ण नोंद झाली. या लॉकडाऊनच्या काळात पो. ना. रेहाना शेख यांनी ५० विद्यार्थ्यांना दत्तक घेतले.
कोरोना संकटात मुंबईतील नायगाव येथे डब्ल्यू २ कंपनीच्या महिला कारकूनपदी कर्तव्य बजावणाऱ्या पो.ना . रेहाना शेख यांनी मुलीच्या वाढदिवसा दिवशी रायगड जिल्ह्यातील (धामणी, पो. वाजे, ता. पनवेल) ज्ञानाई माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना भेटवस्तू व खाद्य पदार्थ पाठवले होते. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचावासाठी हॅण्डग्लोज, सॅनिटायझर, मास्कदेखील पाठवले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी व शालेय प्रशासनाने पो.ना. रेहाना शेख यांच्या मुलीला (व्हिडीओद्वारे) शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांचा गरजा, अडचणी व शिक्षणाची जिद्द लक्षात घेऊन रेहाना शेख यांनी ५० विद्यार्थ्यांना दत्तक घेतले.
उज्ज्वल भारताचे नागरिक घडवण्याचा दृष्टीने पो.ना. रेहाना शेख यांनी घेतलेल्या या निर्णयाचे ज्ञानाई माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आनंदी दिवकर कोळी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष महादेवबुवा शहाबाजकर यांनी आभार मानले.
कोरोना संकटात ५० विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन मुंबई पोलीस खात्याच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण नोंद करणाऱ्या पोलीस नाईक रेहाना नासिर शेख यांनी मुंबई पोलीस खात्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: