मुंबई, दि. २१ मे २०२०: राज्य सरकारने स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परत पाठवण्यासाठी कंबर कसली आहे. एक मे पासून केंद्र सरकारने विशेष श्रमिक गाड्या सुरू केल्या त्या अंतर्गत आतापर्यंत लाखो मजूर आपल्या गावी गेले आहेत.
याच मोहिमेच्या धर्तीवर आज मुंबईतून दोन वाजता उत्तर प्रदेश साठी एक रेल्वे गाडी रवाना होणार आहे. आपल्या गावी जाण्यासाठी चुनाभट्टी येथे स्थलांतरित मजुरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. शेकडो मजूर चुनाभट्टी येथे जमा झाले आहेत. गावी जाण्याची ओढ असली तरीही मजुरांनी सोशल डिस्टन्सला केराची टोपली दाखवली आहे.
आज सकाळीच या स्थलांतरित मजुरांना चुनाभट्टी रेल्वे स्थानकाच्या बाहेरील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मध्ये बोलवण्यात आले आहे. पोलिसांनी मजुरांना नेण्यासाठी विशेष बस देखील तैनात केल्या आहेत. या बसमधून या स्थलांतरित मजुरांना लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचविण्यात येईल. दुपारी दोन वाजता उत्तर प्रदेश मधील गोंडा या जिल्ह्यासाठी ही रेल्वे गाडी धावणार आहे.
विशेष म्हणजे राज्य सरकार या मजुरांकडून रेल्वेचा तिकिटांचे कोणतेही पैसे आकारत नाही. तसेच ह्यांना स्टेशन पर्यंत पोहचण्यासाठी बसेस देखील मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. रेल्वे प्रवासादरम्यानच्या खाण्यापिण्याची सोय देखील राज्य सरकारने करून दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी