आता अमेरिकन शेअर बाजारातून चिनी कंपन्या होणार डिलीटेड

यु एस, दि. २२ मे २०२०: कोरोना विषाणूबाबत अमेरिका आता चीनवर सर्वत्र दबाव आणत आहे. आर्थिक आघाडीवर अमेरिका एकामागून एक चीनला धक्का देत आहे. डोनाल्ड ट्रम्प आता अमेरिकन शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या चीनी कंपन्यांवर डोळा ठेवून आहेत. काल अमेरिकेन सिनेटमध्ये एक बिल पास करण्यात आले त्यावरून अमेरिका चीनवर किती क्रोधीत आहे हे दिसून येते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनने सर्व जगामध्ये कोरोनाव्हायरस पसरवला आहे असा आरोप केला आहे.

चीनमधील या व्हायरसमुळे पूर्ण जग प्रभावित झाले आहे. सर्व देशांच्या अर्थव्यवस्था मोडकळीस आल्या आहेत. याचा परिणाम अमेरिकेत सर्वात जास्त पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे चीनला दबावाखाली आणण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प एका मागे एक अशी पावले उचलत आले आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा चीन विरोधात नवीन कारवाई केली आहे. अमेरिकन शेअर बाजार मधील चिनी कंपन्या डी लिस्टिंग करण्याचे बिल त्यांनी पास केले आहे. परंतू हे बिल लागू होण्यासाठी आणखीन काही कालावधी लागू शकतो व काही राजकीय घडामोडी देखील होणे अपेक्षित आहे.

असे म्हटले जात आहे की विरोधी पक्षांनी सुद्धा या बिलाला समर्थन दर्शवले आहे. अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे अमेरिकन शेअर बाजारांमध्ये लिस्टेड असलेल्या चिनी कंपन्यांसमोर आता मोठी समस्या उभी राहिली आहे. असे देखील म्हटले जात आहे की, अमेरिकन कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व्हावी म्हणून हा निर्णय घेतला असावा.

मीडिया रिपोर्टनुसार सुमारे आठशे चिनी कंपन्या अमेरिकन शेअर बाजारांमध्ये लिस्टेड आहेत. अमेरिकेच्या या निर्णयामुळे अलिबाबा आणि बायडू यांसारख्या मोठ्या कंपन्यांना देखील याचा फटका बसणार आहे. अमेरिकेने घेतलेला हा निर्णय जगातील सर्व शेअर बाजारासाठी एक धक्का मानला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा