मका खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन

6

औरंगाबाद, दि.२२ मे २०२० : औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावरील सहकारी खरेदी विक्री संघाच्या आठही खरेदी केंद्रांवर मका खरेदीची नोंदणी सुरू झाली आहे.

खरेदीची व ऑनलाईन नोंदणीची मुदत ३० जून २०२० पर्यंत आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करून घ्यावी. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मका खरेदीसाठी नंतर मेसेजद्वारे कळवण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जिल्हयातील आठ खरेदी केंद्रांना मान्यता दिलेली आहे. मक्याचा हमीभाव 1 हजार ७६० रुपये प्रति क्विंटल आहे. शेतकऱ्यांच्या पीकपेरा क्षेत्रानुसार एकरी १०.१५ क्विंटलची खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणी करताना शेतकऱ्यांनी स्वतःचे आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स व सातबारा उतारा मका (रब्बी) पीकपेरासह जोडणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरांवरील पैठण, कन्नड, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री सहकारी खरेदी विक्री संघ हे खरेदीची ठिकाणे असल्याचेही त्यांनी कळवले आहे.


न्युज अनकट प्रतिनिधी: