अम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे संबोधन

नाव दिल्ली, दि. २२ मे २०२०: चक्रीवादळाने पुन्हा एकदा भारताच्या किनारी भागाला, विशेष करून पुर्वेकडच्या भागाला ग्रस्त केले, त्यातही सर्वात जास्त दुष्परिणाम पश्चिम बंगालच्या आपल्या बंधू-भगिनींना, पश्चिम बंगालच्या नागरिकांना झेलावा लागला, इथे संपत्तीचेही मोठे नुकसान झाले आहे.

चक्रीवादळ येण्याच्या शक्यतेपासून मी सातत्याने सर्व संबंधिताच्या संपर्कात होतो. भारत सरकारही राज्य सरकारच्या सतत संपर्कात होते. चक्रीवादळामुळे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी आवश्यक पाऊले उचलण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित सर्वतोपरी प्रयत्न केले. तरीही सुमारे 80 जणांचे प्राण आम्ही वाचवू शकलो नाही याचे आम्हाला सर्वाना दुःख आहे. ज्या कुटुंबानी आपले स्वकीय गमावले आहेत त्या कुटुंबांच्या दुःखात केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आम्ही सर्व सहभागी आहोत. संकटाच्या या काळात आम्ही त्यांच्या समवेत आहोत.

संपत्तीचे नुकसानही मोठे आहे मग कृषी असो, उर्जा क्षेत्र असो, दूर संवाद असो, घरांचे नुकसान असो, पायाभूत सुविधांचे असो, व्यापार जगताशी संबंधित लोक असोत, शेती क्षेत्राशी जोडलेले असोत, प्रत्येकाचे नुकसान झाले आहे .

आज प्रभावित भागाचा मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्या समवेत, दौरा करत मी हवाई पाहणी केली. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री यांनी प्राथमिक अंदाजाचा तपशील विस्ताराने सादर केला आहे.  शक्य तितक्या लवकर तपशीलवार सर्वेक्षण करावे असे आम्ही निश्चित केले आहे. कृषी, उर्जा, दूरसंवाद, घरांची स्थिती, पायाभूत सुविधांची स्थिती यासह इतर क्षेत्रांचे हे सर्वेक्षण असेल.

केंद्र सरकार कडूनही तात्काळ एक पथक येणार असून या सर्व क्षेत्राचे सर्वेक्षण करेल आणि आम्ही एकत्रितपणे पुनर्वसन असो, पुनर्स्थापना असो किंवा पुनर्बांधणी असो याबाबत व्यापक योजना तयार करून  पश्चिम बंगालच्या या संकटाच्या काळात आम्ही संपूर्ण सहकार्य देऊ आणि हे राज्य लवकरात लवकर यातून सावरून पुन्हा उभे राहावे, लवकरात लवकर जलद गतीने पुढे येत राहावे यासाठी भारत सरकार खांद्याला खांदा लावून काम करेल आणि आवश्यकता पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या नियमांचा उपयोग करत पश्चिम बंगालच्या मदतीसाठी आम्ही उभे राहू.

संकटाच्या या काळात राज्य सरकारला तात्काळ अडचण भासू नये यासाठी अग्रिम सहाय्य म्हणून एक हजार कोटी रुपयांची भारत सरकार कडून व्यवस्था केली जाईल.त्याच बरोबर ज्या कुटुंबानी आपले आप्तस्वकीय गमावले आहेत त्या कुटुंबाना पंतप्रधान सहाय्यता निधीतून दोन लाख रुपयांची मदत आणि जखमींना ५० हजार रुपयांचे सहाय्य देण्यात येईल.

संपूर्ण जग एका  संकटाशी लढा देत आहे. भारतही कोरोना विषाणू विरोधात लढा देत आहे. कोरोना विषाणू विरोधातल्या लढ्यात यशस्वी होण्याचा मंत्र आणि चक्री वादळात यशस्वी ठरण्याचा मंत्र, दोन्ही परस्पर विरोधी आहेत.

कोरोना विषाणू विरोधातल्या लढ्यातला मंत्र आहे- जिथे आहात तिथेच राहा, आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, जिथे जाल तिथे परस्परात सुरक्षित अंतर राखा, मात्र चक्रीवादळा पासून स्वतःचा बचाव करण्याचा मंत्र आहे- चक्रीवादळ येत आहे, लवकर लवकर सुरक्षित स्थळी जा, घर सोडून तिथे पोहचण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच दोन वेगवेगळ्या प्रकारच्या लढाया पश्चिम बंगालला एकाच वेळी लढाव्या लागत आहेत.

मात्र या परिस्थितीतही ममताजी यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने पराकोटीचे प्रयत्न केले आहेत. भारत सरकारही सातत्याने राज्य सरकारला सहकार्य करत असून संकटाच्या या काळात आवश्यक बाबींसाठी आणि येत्या काळात आवश्यक असणाऱ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

संपूर्ण देशाला ज्यांचा अभिमान आहे अशा राजा राममोहन राय यांची आज जयंती आहे. या दिवशी पश्चिम बंगालच्या पवित्र भूमीवर असणे ही माझ्या मनाला स्पर्श करणारी बाब आहे. मात्र संकटाशी आपण झुंज देत आहोत अशा काळात इतकेच सांगू इच्छितो की काळानुरूप समाज परिवर्तनाचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण एकजुटीने उज्वल भविष्यासाठी, भावी पिढी घडवण्यासाठी समाज सुधारणांचे काम जारी ठेवू हीच राजा राममोहन राय यांना खरी आदरांजली ठरेल.

संकटाच्या या काळात संपूर्ण देश आपणा समवेत आहे असा विश्वास मी पश्चिम बंगालच्या सर्व बंधू-भगिनींना देतो. येत्या काळातल्या कामासाठी भारत सरकार खांद्याला खांदा लावून आपणा समवेत आहे. संकटाच्या या काळात आपल्याला भेटायला आलो आहे मात्र कोरोना  विषाणूमुळे सर्व नागरिकांना भेटू शकत नाही याचा मनात सल राहील. इथून मी ओडिशाला जाईन, तिथेही  हवाई पाहणी करेन, मुख्यमंत्री आणि राज्य सरकारशी चर्चा करेन.

या संकटकाळात मी पश्चिम बंगाल समवेत आहे याचा पुनरुच्चार करतो. लवकरात लवकर आपण या संकटातून बाहेर पडावे यासाठी मी आपण सर्वांसमवेत राहीन.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा