पायलट ट्रेनिंग घेत असलेल्या प्रशिक्षणर्थी विद्यार्थिनीचा विनयभंग

बारामती, दि. २४ मे २०२०: बारामती येथील कार्व्हर एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या राष्ट्रीय स्तरावरील खाजगी संस्थेतील प्रशिक्षकाविरोधात विनयभंग केल्याची तक्रार प्रशिक्षित विद्यार्थिनीने तालुका पोलीस स्टेशनला दिली आहे. याप्रकरणी मुख्य पायलट विवेक आगरवाल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी आरोपीस अद्यापही अटक
केलेली नाही.

या पीडित प्रशिक्षित विद्याथीर्नीने ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार्व्हर एव्हिएशन प्रा.लि.बारामती येथे ही विद्यार्थिनी कर्मशियल पायलटचे प्रशिक्षण घेत होती. दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास या विद्यार्थिनीचे  सोलोचे प्रशिक्षण होते. हे प्रशिक्षण सुरू असताना सीएफआय कॅप्टन विवेक फ्लाईंग करीत होते, यावेळी विद्यार्थिनीचा  उजवा हात थ्रॉटलवर होता. त्यावेळी आरोपी ने विद्यार्थिनीचा  थ्रॉटलवरील हात पकडला.  यावेळी एअरक्राफ्टचे पावर कमी जास्त होत असल्याने आरोपीने  हात पकडला असेल म्हणून विद्याथीर्नी त्यांना काही बोलली नाही.

त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास विद्यार्थिनीला आरोपी फ्लाईग साठी घेऊन गेले. त्यावेळी त्यांनी पुन्हा तिचा हात पकडला व तिच्या  दंडावर थोपटून ‘आप अच्छा कर रही हो’ असे म्हणाले. त्यावेळी आरोपीने आनंदाचे भरात  स्पर्श केला असेल असे वाटून विद्यार्थिनीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याच दिवशी सायंकाळी ५ च्या सुमारास पुन्हा तिला फ्लाईगसाठी घेऊन गेले. त्यावेळी त्यांनी तिचा पुन्हा थ्रॉटलयरवरील हात पकडला. त्यावेळी मी त्यांना काही एक बोलले नाही.

त्यानंतर दि. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पुन्हा मला  फ्लाईगसाठी घेवून गेले. आमची फ्लाईट टेकआॅफ झाल्यानंतर त्यांनी माझा पुन्हा हात धरला व माझ्या मनास लज्जा उत्पन्न होईल असा हात फिरवला. त्यावेळी मी त्यांना म्हणाले की, यावर मला अनकम्फर्टेबल वाटत आहे. मला फ्लाईट लॅन्ड करावयाचे आहे. असे म्हणून मी त्यांना फ्लाईट लॅण्ड करण्यास लावली.

त्याच दिवशी सायंकाळी ५ च्या सुमारास पुन्हा मला फ्लाईगसाठी घेऊन गेले. त्यावेळी त्यांनी त्याचे सीट पाठीमागे घेऊन मी फ्लाईट व्यवस्थीत चालविते का? हे पाहत होते. म्हणून मला वाटले की, दुपारी जो प्रकार झाला तो मला आवडलेला नाही म्हणून ते शांत बसले असावेत. त्यानंतर (दि.५) रोजी नेहमीप्रमाणे दुपारी  मला फ्लाईंगसाठी घेवून गेले. फ्लाईट टेकआॅफ झालेवर ते पुन्हा माझा हात धरत होते. त्यावेळी मी त्याचा
हात झटकला. थोड्यावेळाने आम्ही फ्लाईट लॅण्ड केली. त्यावेळी त्यांनी माझ्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फियार्दीत नमूद करण्यात आले आहे . त्यानंतर याबाबतची तक्रार संस्थेच्या व्यवस्थापनासह पोलीसांकडे केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे करीत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा