शिस्तीने, संरक्षण साहित्याचा वापर करत कोरोनाला हरवू या : शिवानंद टाकसाळे

7

औरंगाबाद, दि.२८मे २०२० : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आजच्या या कठीण परिस्थितीत या आजाराला न घाबरता शिस्तीने सामोरे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी लढाऊ वृत्तीने, धाडसाने, संरक्षण साहित्याचा योग्य वापर करत कोरोनाला हरविण्याची मानसिकता घट्ट करण्याचा संदेश, अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे यांनी दिला.

औरंगाबाद शहर तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन आजच्या कोरोना विषाणूच्या झालेल्या प्रसाराची पाहणी त्यांनी केलेली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये, यासाठी जनजागृती करण्यावर त्यांचा अधिक भर आहे. टाकसाळे म्हणतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे, परंतु चांगले अनुभव या भेटीतून आले आहेत. अशा कठीण प्रसंगात प्रशासनास मोठ्याप्रमाणात लोकप्रतिनिधी सहकार्य करताहेत. लोकांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये, यासाठी खबरदारी घेण्याचा प्रत्येकाला ते सल्ला देताना दिसत आहेत.

महसूल, आरोग्य यंत्रणेसह पोलीस, आशा वर्कर, व्यवसाय शिक्षण आदी विभागाचे अधिकारी, कर्मचारी कंटेन्मेंट क्षेत्रात चांगले काम करत आहेत. लोकांमध्ये जनजागृती निर्माण करत आहेत.

स्वच्छता, सामाजिक अंतर, वयोवृद्ध व्यक्तींची अधिक काळजी घेण्याचा सल्ला या परिसरात गस्ती पथकाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. मास्क, सॅनिटायजरचा वापर, वारंवार हात धुणे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
समता नगर परिसरात असलेल्या नागरिकांना घरपोच अन्नधान्य, किराणा सामान, स्वस्त धान्य, औषधी आदी जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याची व्यवस्था या भागात लोक प्रतिनिधींच्या सहकार्याने करण्यात आलेली आहे.

ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशांना लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत रेशन किटचे वाटपही झालेले आहे. गोरगरीब नागरिकांचे प्रश्न समजून त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तूदेखील याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याचे टाकसाळे यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी: