रब्बी हंगामात उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात वाटाणा हे एक महत्वाचे पिक आहे. वर्षभर असणारी मागणी आणि चांगला भाव असे या पिकाचे वैशिष्ट्य आहे. हे पिक लागवडीचे तंत्रज्ञान आपण जाणून घेऊ.
हवामान व जमीन: पीकवाढीसाठी महिन्याचे सरासरी तापमान 10 ते 20 अंश से. असावे लागते. या पिकाच्या लागवडीसाठी मध्यम, सुपीक, सच्छिद्र, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, खोल जमीन निवडावी.
पुर्वमशागत : जमिन मशागत चांगली केल्यास मुळांची वाढ झपाट्याने होते. शेत समांतर व भुसभुशीत करून घ्यावे. लागवडीपूर्वी प्रति हेक्टरी दहा टन शेणखत मिसळून द्यावे.
लागवड : लागवड ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापासून नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करता येते.
खत व्यवस्थापन : ओलीताखाली लागवडीच्यावेळी हेक्टरी 50:75:50 ही खत मात्रा तर 25 किलो नत्र एक महीन्याने द्यावे. हेक्टरी आठ ते दहा गाड्या चांगले कुजलेले शेणखत लागवडीपुर्वी व लागवडीनंतर विभागुन द्यावे
पाणी व्यवस्थापन : या पिकाला इतर भाजीपाला पिकांच्या मानाने कमी पाणी लागते. लागवडीनंतर पिकास हलके पाणी द्यावे.
काढणी व उत्पादन
▪ वाटाणा 45 ते 65 दिवसात काढणीस तयार होतो.
▪ शेंगाचा गडद हिरवा रंग बदलून त्या फिक्कट हिरव्या रंगाच्या व टपोऱ्या दिसू लागतात
▪ काढणी 3 ते 4 तोड्यात पूर्ण होते. तोडणीचा हंगाम 3 ते 4 आठवडे चालतो.
▪ लवकर येणाऱ्या जातीचे हिरव्या शेंगाचे एकरी उत्पादन 10 ते 15 क्विंटल तर मध्यम कालावधी तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन 20 ते 25 क्विंटलपर्यंत आणि उशिरा येणाऱ्या जातीचे 30 ते 40 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन मिळते.
▪ शेंगातील दाण्याचे प्रमाण 40 ते 45 टक्के असते.
▪ आठवड्यातून दोनदा तोडणी करणे सोयीस्कर ठरते.