पुणे, दि.२९ मे २०२० : पिंपरी-चिंचवड शहरच नव्हे तर संपूर्ण राज्य ‘करोना’ विरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठिंबा मिळत असून सामुहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज(शुक्रवारी) व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या वॉर रुमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देत वॉर रूमच्या कार्यप्रणालीची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी शहरातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी पालिकेचेआयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते नाना काटे, आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, नगरसेवक राजू मिसाळ, पालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, पालिका व वायसीएम अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. स्वत: काळजी घेतल्यास तसेच स्वच्छता राखून शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन केल्यास आपण करोनावर मात करू शकतो. ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची ही वेळ आहे. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
राज्यातील उद्योग सुरु करायला परवानगी दिली आहे. मात्र कामगार परराज्यात निघून गेल्यामुळे काही अडचणी येत आहेत. वेळ लागेल मात्र परिस्थिती निश्चितच पूर्वपदावर येईल. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पोलीस, डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना साथ देण्याची गरज असल्याचे अजित पवार म्हणाले.
या लढ्यात सर्वांचा पाठींबा आणि साथ आजपर्यंत मिळाली आहे, यापुढेही कायम ठेवल्यास करोनावर निश्चितच विजय मिळवू असेही पवार म्हणाले.
न्युज अनकट प्रतिनिधी: