हडपसर, दि.२९ मे २०२० : येथे एका प्रसिद्ध दूध डेअरीच्या मालकासह तेथील ११ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आल्यानं सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे मगरपट्टा व हडपसर परिसरात एकच खळबळ पसरली आहे.
मागील चार दिवसांपासून संबंधित डेअरीच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यांना करोनाची बाधा झाल्याचा रिपोर्ट आल्याने डेअरीच्या मालकासह ११ जणांना तपासणीसाठी ताब्यात घेतले होते.
गुरुवारी रात्री उशिरा त्यांचा रिपोर्ट आला असून ११ जण कोविड पॉझिटिव्ह असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे या डेअरीमधून जवळील सोसायटीच्या ज्या नागरिकांनी दूध, लस्सी ,समोसे व स्वीटचे पदार्थ खरेदी केलेले आहे, त्या सर्वांची महापालिकेच्या पथकाकडून प्राथमिक तपासणी करण्याचे काम सकाळीच सुरू करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात देखील ही डेअरी सुरू होती. या डेअरीतून अनेक ठिकाणच्या नागरिकांनी दूध, लस्सी, समोसे व स्वीट अशा विविध पदार्थांची खरेदी केलेली आहे. त्यामुळे या डेअरीतील कर्मचाऱ्यांशी संपर्क आलेल्या नागरिकांची शोध घेणे हे महापालिके पुढे मोठेआव्हान आहे.
डेअरी मालकासह ११ जणांना कोरोना झाल्याच्या वृत्तास हडपसर सहायक आयुक्त कार्यालयाच्या डॉ. स्नेहल काळे, यांनी दुजोरा दिला आहे.
‘सकाळपासूनच डेअरीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची प्राथमिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. यापैकी कुठल्याही नागरिकामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांची तपासणी केली जाईल, असं त्यांनी “न्यूज अनकट” शी बोलताना सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे