दिव्यांग मुलांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा आपुलकीचा हात

पुणे, दि. २९ मे २०२०: कोरोनाव्हायरस मुळे सर्वजण त्रस्त झाले आहेत. या काळात सर्व जीवन व्यवस्था विस्कळीत झाली आहे. जिथे समाजातील प्रत्येक घटक कोरोनाने ग्रासला आहे तिथे दिव्यांग मुले पण त्याला अपवाद राहिली नाहीत. उलट त्यांची जास्त काळजी घेण्याची गरज आहे. या सर्व मुलांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आपल्या परिवारातील एक घटक मानत त्यांच्याप्रती आपली सामाजिक जबाबदारी कायम घेत आलेला आहे.

सध्याच्या या संकटाच्या काळात महासंघाच्या कोथरूड शाखेने आपली सामाजिक बांधिलकी जपत पौड रोड येथील सावली या दिव्यांग मुलांच्या शाळेतील ५०-६० मुलांना मास्क व सैनिटायझरचे वाटप केले आहे. त्याचबरोबर महिनाभर पुरेल एवढे धान्य, किराणा यासारख्या जीवनावश्यक गोष्टींचे देखील वाटप करण्यात आले.

महासंघाच्या कोथरुड शाखेने केलेल्या या कामाचे कौतुक सावली संस्थेचे प्रमुख श्री ठकार सर व विश्वस्त सौ अलका दीपक पारखी यांनी देखील केले. हा कार्यक्रम पार पडत असताना सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळण्यात आले. या कार्यक्रमास तिळगुळकर दाम्पत्य यांचे प्रायोजकत्व लाभले व आपल्या मुलाचा वाढदिवस त्यांनी एका अनोख्या पद्धतीने साजरा केला.

याव्यतिरिक्त मातोश्री वृद्धाश्रमातील २०० वृद्धांना मास्क, सैनिटायझर तसेच जनता वसाहत पर्वती, पुणे महिला मंडळ येथील गरीब महिलांना पोटभर जेवण देण्यात आले.
या सर्व उपक्रमांत जिल्हाध्यक्षा सौ केतकी कुलकर्णी, शाखा अध्यक्ष माधव व नेहा तिळगुळकर, सौ भारती भोपळे (शाखा अध्यक्षा महिला आघाडी), खजिनदार अनिरुद्ध पळशीकर सहभागी झाले.
तसेच सौ जयश्री घाटे, डॉ अरुण व चित्रा जोशी, डॉ अचला दीक्षित, सौ स्मिता इनामदार, सौ कुंदा बिडकर यांचे सहकार्य लाभले.

हा कार्यक्रम पार पडत असताना कॅनडास्थित जिल्हा सरचिटणीस श्री मंदार रेडे यांची या नियोजनांत मोलाची मदत झाली तसेच जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा