इंदापूर, दि.३० मे २०२०: पावसावर आधारित इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पशुधन जगवण्यासाठी मक्याचे पीक घेतले आहे. मात्र, या पिकावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
त्यामुळे शेतकरी, पशुपालक अडचणीत आले असून दुग्ध व पोल्ट्री व्यवसायालाही मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. जनावरांच्या आहारासाठी प्रामुख्याने मक्याचे पीक घेतले जाते.
डेअरी व पोल्ट्री व्यवसायात पशुखाद्यामध्ये कच्चा माल म्हणून मक्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, गतवर्षीपासून इंदापूर परिसरात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
या अळीच्या प्रादुर्भावामुळे मक्याचे उत्पादन घटत असल्याने त्याचा थेट परिणाम दुग्ध व पोल्ट्री व्यवसायात दिसून येत आहे. शिवाय जनावरांसाठी लागणाऱ्या पशुखाद्याच्या दरामध्ये मागील काही दिवसांमध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ झाली आहे. ऐन दुष्काळात पाण्याचा प्रश्न गंभीर आणि कोरोना, अमेरिकन अळीच्या प्रादुर्भावामुळे चाऱ्याचे संकट पशुपालकांवर ओढवले आहे.
तालुक्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. शेतकरी खरिपात जनावरांच्या चाऱ्यासाठी मका, नेपियर, लुसर्ण घास, कडवळ या पिकांची लागवड करत असतात. मात्र, पावसाअभावी चारा पिकाच्या लागवडीचे प्रमाण कमी आहे. त्याचबरोबर बाजरी, तूर, मूग आदि खरिपातील पिकांच्या पेरणीचे प्रमाण कमी असल्याने बळीराजा दमदार पावसाची अपेक्षा आहे.
मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात तसेच इंदापूर तालुक्यातही आढळून येत आहे. ही अळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. त्यामुळे मका उत्पादनात मोठी घट येत आहे.
या अळीचा प्रादुर्भाव झाल्यावर नियंत्रण करणे अवघड आहे; मात्र शेतकऱ्यांनी त्वरीत प्रतिबंधात्मक उपाय केल्यास अळीचा प्रादुर्भाव टाळात येऊ शकतो असे मत कृषीतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
सद्यस्थितीत मका पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादूर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. लष्करी अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. यामध्ये बीज प्रक्रिया कामगंध, सापळे, प्रकाश सापळे, पक्षी थांबे, जैविक कीड नियंत्रण या बाबींचा समावेश आहे.
क्रॉपसपच्या माध्यमातून क्षेत्रिय कर्मचाऱ्यांकडून किडीचे सर्वेक्षण करण्यात येत असून शेतीशाळा तसेच इतर माध्यामांतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे कृषी सहाय्यक प्रशांत मोहोळकर यांनी “न्यूज अनकट” शी बोलताना सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे