औरंगाबाद ग्रीन झोनमध्ये आणावे : पालकमंत्री सुभाष देसाई

8

औरंगाबाद, दि.३० मे २०२०: औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्ग रोखण्यात यंत्रणेला यश मिळत आहे. ही समाधानकारक बाब आहे. त्याच पद्धतीने शहरातील कोरोना संसर्गही आटोक्यात आणून औरंगाबादला ग्रीन झोनमध्ये आणावे, असे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज (शनिवार) येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देश दिले.

यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिजा मेत्रेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले, घाटी रुग्णालयाचे डॉ. शिवाजी सुक्रे, औषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुदंर कुलकर्णी यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन पालकमंत्री यांनी शहरातील रुग्ण संख्या नियंत्रीत करण्यासाठी टास्क फोर्सच्या सूचनांप्रमाणे उपचार पद्धती अधिक सशक्त करण्याचे निर्देश दिले. लोकांची मानसिकता मजबूत करणे ही एक महत्वाची बाब असून त्यादृष्टीने मनपाने वॉर्ड निहाय ज्या ठिकाणी गरजेचे असेल तिथे ताप तपासणी शिबिरांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करावेत.

यामध्ये खाजगी डॉक्टरांची मदत घ्यावी. जिल्हा रुग्णालय, घाटी व इतर रुग्णालय, उपचार केंद्रात सर्व आवश्यक सोयी सुविधा सज्ज ठेवण्यास प्राधान्य द्यावे. ऑक्सीजनचा, रक्ताचा व्यापक साठा उपलब्ध करुन ठेवावा. अतिगंभीर रुग्णांसाठी आवश्यक औषधोपचार, इंजेक्शन, व्हेंटीलेटर यासह इतर गरजेच्या सर्व सुविधा तातडीने सज्ज ठेवाव्यात, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

न्युज अनकट प्रतिनिधी: