कोरोना रोखण्यासाठी मंचरचा छत्री पॅटर्न

मंचर ,दि.३१ मे २०२०’ सरकारने लॉकडाऊन शिथिलता आणली त्यामुळेच  मंचरची बाजारपेठ सुरु झाली. साहजिकच नागरिकांची मोठी गर्दी झाली अन् सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला. जनजागृती करूनही नागरिक निष्काळजीपणे वावरत होते. मग यावर मंचरचे सरपंच दत्ता गांजाळेंनी एक शक्कल लढवली. केरळच्या धर्तीवर गांजळेंनी गावात ‘छत्री पॅटर्न’ राबवायचं ठरवलं. महिलांनी ही कल्पना डोक्यावर घेवून महिलांनी घरोघरी जाऊन छत्री वापरण्याचं आवाहन केलं, यातूनच ‘सेल्फी विथ अम्ब्रेला’चे स्टेटसही झळकू लागलेत.

भारत लॉकडाऊन झाल्याने गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या बाजारपेठा ठप्प झाल्या. अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळता इतर दुकानांचे शटर्स बंद राहिले.परंतू ४ थ्या लॉकडाऊनमध्ये सरकारने शिथिलता आणली. मंचर हे नॉन रेड झोनमध्ये येत असल्याने येथील बहुतांश दुकाने सुरू झाली. नागरिकांनी ही दुकानाबाहेर खरेदीसाठी गर्दी केली. पण गेली दोन महिने ज्या कोरोनाची घराघरात चर्चा रंगली, त्यापासून बचावासाठी काय उपाययोजना करायला हव्यात याबाबत जनजागृती झाली. त्याचा मंचरकरांवर अपेक्षित परिणाम झाला नसल्याचं दिसून आलं. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला. मग यावर कसा तोडगा काढायचा असा प्रश्न मंचर ग्रामपंचायतीसमोर उभा ठाकला. त्यावर वेगवेगळे पर्याय सुचवण्यात आले.

त्यावेळी सरपंच दत्ता गंजाळें यांनी केरळचा ‘छत्री पॅटर्न’ ची कल्पना मांडली . प्रत्येकाच्या हातात छत्री आली तर आपोआप सोशल डिस्टंसिंग राखलं जाईल. त्यामुळेच केरळच्या धर्तीवर मंचरमध्ये ‘छत्री पॅटर्न’ राबवण्याचा एकमताने निर्णय झाला. सरपंच दत्ता गांजाळेंनी स्वतःपासून याची सुरुवात केली. गांजाळे छत्री घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करायला रस्त्यावर उतरले.

दुसरीकडे महिला वर्गाने मात्र या भन्नाट कल्पनेला डोक्यावर घेतलं. ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांनी घरोघरी जाऊन छत्री वापरण्याचं आवाहन केलं. ‘सेल्फी विथ अम्ब्रेला’ ची हाक देण्यात आली. बघता-बघता अबाल-वृद्धांपासून सर्वांच्याच स्टेटसवर छत्रीसोबतचे फोटो झळकू लागले. हळूहळू महिला छत्री घेऊनच घराबाहेर पडू लागल्या. यामुळे सोशल डिस्टंसिंग राखला जाऊ लागला आणि उन्हापासूनही बचाव होऊ लागला. हा दुहेरी फायदा ओळखून महिलांनी ‘छत्री पॅटर्न’ स्वीकारला आणि हा उपक्रम शंभर टक्के राबवण्यासाठी स्वतःच्या हाती घेतला. आता घरातील महिलाच पुढे आहेत म्हटल्यावर पुरुषांनी देखील यात सहभाग घेण्याशिवाय पर्याय उरलाच नाही. त्यामुळे तुम्हाला कोरोनापासून चार हात लांब राहायचं असेल, तर या छत्री पॅटर्नचं अनुकरण तुम्ही नक्की.

न्यूज अनकट प्रतिनीधी: साईदिप ढोबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा