लातूर, दि.३१ मे २०२०: कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसुल, आरोग्य आणि पोलिसांवरील ताण वाढला आहे. त्यांच्या मदतीसाठी भाजपाकडून दोन हजार स्वयंसेवक देणार असल्याची माहिती आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
झुम ॲपच्या माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषद बोलताना आ. संभाजी पाटील म्हणाले की, बांधावर बी-बियाणे व खत देण्याची घोषणा सरकारने केली असली तरी शेतकऱ्यांकडून अतिरिक्त खर्च घेतला जात आहे. कृषी विभागाने बांधावर खत, बी-बियाणे देण्याचे केवळ कागदोपत्री नियोजन केले असून वास्तवात हा खर्च शेतकऱ्यांडून वसूल केला जात असल्याचा आरोप निलंगेकर यांनी यावेळी केला.
देशात लातूर जिल्हा परिषद दिव्यांगांना मदत करण्यात आघाडीवर असल्याचेही ते म्हणाले. त्यांनी खा. सुधाकर शृंगारे, जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, आ. अभिमन्यु पवार, जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिल्याचे यावेळी सांगीतले.
मुंबई पुण्याहून जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे त्यांची थर्मल स्क्रिनिंग झाली पाहिजे. लातूर जिल्ह्यात जे रुग्ण आढळले आहेत, त्यांना पुण्या मुंबईच्या प्रवासाचा इतिहास आहे. ही बाब लक्षात घेता स्क्रिनिंग आवश्यक आहे. प्रशासनाचे काम सध्या चांगल्या प्रकारे सुरु असले तरी महसूल, आरोग्य विभाग आणि पोलिसांवर ताण वाढला आहे. त्यासाठी त्यांच्या मदतीला भाजपाचे दोन हजार स्वयंसेवक देणार असल्याचे निलंगेकर यांनी यावेळी सांगीतले.
न्युज अनकट प्रतिनिधी: